India vs Sri Lanka 1st Test Result : गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे भारताची WTC विजयाची टक्केवारीही बदलली आहे. मानव सुथारने सामन्यात १० विकेट्स घेतल्या.

मानव सुथारच्या फिरकीने श्रीलंकेची दाणादाण
दुसऱ्या डावात ३७२ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या सोनल दिनुषाने एकाकी झुंज देत ८४ धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार धनंजय डी सिल्वाने ५९ धावांचे योगदान दिले. मात्र, या दोघांचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाला भारतीय फिरकीपटूंसमोर तग धरता आला नाही.
भारताकडून युवा फिरकीपटू मानव सुथार याने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत ६ बळी मिळवले, तर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने २ गडी बाद केले. विशेष म्हणजे, मानव सुथारने या संपूर्ण सामन्यात दोन्ही डावांत मिळून तब्बल १० बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आणि भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
WTC गुणतालिकेत भारताला फायदा, पण…
या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत भारताच्या विजयाची टक्केवारी (PCT) ५३.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. या विजयासह टीम इंडियाने WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, भारताच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून संघ अद्याप ५ व्या स्थानावरच कायम आहे. दुसरीकडे, या दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी ३३.३३ वर घसरली असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?
टॉप चार संघांच्या मजबूत कामगिरीमुळे भारतीय संघ अद्याप पाचव्या स्थानावरच आहे. ‘द ओव्हल’वर होणाऱ्या WTC २०२५-२७ च्या अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी भारतासमोर आता दोन मुख्य समीकरणे आहेत.
पहिले समीकरण: जर भारताने उर्वरित ८ कसोटी सामन्यांपैकी ७ सामने जिंकले, तर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के होईल आणि इतर कोणत्याही संघाच्या निकालावर अवलंबून न राहता ते थेट फायनलसाठी पात्र ठरतील.
दुसरे समीकरण: ६ सामने जिंकल्यास भारताची टक्केवारी ६२.९६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जे संथ षटकांच्या दंडापासून (Slow over-rate penalty) वाचल्यास फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बऱ्यापैकी सुरक्षित मानले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान कायम, बांगलादेश भारताच्या पुढे
WTC गुणतालिकेवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाने आपली निर्विवाद सत्ता कायम राखली असून ते ७७.७८ टक्के विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिका ७५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड ७२.२२ टक्कयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा बांगलादेशचा संघ ६६.६७ टक्क्यांसह भारताच्या वर चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

