![]()
अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार वानखडे यांनी बुधवारी रुग्णालयात जाऊन संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सध्या उपचार घेत असलेल्या सर्व पाचही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये आणि त्यांच्या प्रकृतीवर योग्य लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना खासदार वानखडे यांनी दिल्या. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण समोर आणावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार वानखडे यांनी केली आहे. या घटनेमुळे निवासी व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, खासदार बळवंत वानखडे यांनी महर्षी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. संस्थाचालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Source link
मेळघाटातील 5 विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय:खासदार वानखडेंनी घेतली भेट, चौकशीचे निर्देश; प्रकृती स्थिर
