![]()
वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
.
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी आणि संतांचे वंशज यांचे पूजन आषाढी एकादशीपूर्वी करण्यात येत असून, यंदाचे हे चौथे वर्षे आहे. पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य व्हावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व साहित्य काठी, घोंगडी व विठ्ठलाची मूर्ती देऊन चार वारकरी फडांचे प्रमुख, तीन संतांचे वंशज आणि दोन गुरुवर्य संत अशा या नऊ संत-महंतांचे पाद्यपूजन केले.
या वर्षी हा सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य संतांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे रविवारी (२८ जून) मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. फडकरी मंडळींपैकी देहूकर फडाचे बाबासाहेब देहूकर महाराज, वास्कर फडाचे नामदेव महाराज, आचरेकर फडाचे हरिदास महाराज, शिरवळकर फडाचे भागवत महाराज.
संत सावता महाराजांचे वंशज रविकांत महाराज, संत जगनाडे महाराजांचे वंशज अनिल महाराज, तसेच जगद्गुरु तुकोबारायांच्या मुख्य शिष्यंपैकी एक असलेल्या मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील श्री संत बहिणाबाई महाराज पाठक यांचे १३ वे वंशज पवन गुरुजी पाठक हे होते. तसेच दोन वैराग्यमूर्ती हभप शंकर बाबा मराठे महाराज आणि राष्ट्रसंत योगीराज परांडे महाराज हे होते. या नऊ संत-महंतांना विठ्ठल मूर्ती काठी व घोंगडी अशी भेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या आधी उमेश महाराज दाशरथे यांनी आपल्या कीर्तनातून संतपूजनाचे महत्त्व सांगितले. संताच्या पूजनाचे पुण्य ईश्वरपूजेइतके श्रेष्ठ असल्याचे माऊलींची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांच्या साहित्यातील उदाहरणे देऊन स्पष्ट केले. संतांचा सन्मान केल्याने पुण्य लाभते हे त्यांनी पटवून दिले.
