Lalit Modi India Return : आयपीएलचा संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदीला २१ जुलै रोजी न्यायालयीन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. निकालानंतर त्याने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला मायदेशी परतण्याची शक्यता असल्याचं सांगितलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलचा संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. २१ जुलै रोजी न्यायालयीन प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर ललित मोदीने प्रतिक्रिया देताना भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या १६ वर्षांपासून भारताबाहेर असलेल्या ललित मोदी यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला मायदेशी परतण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी आपल्या संघर्षाबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
हा अद्भुत दिवस
ललित मोदीने निकालानंतर आनंद व्यक्त केला. गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षात अखेर आपली बाजू योग्य ठरल्याचं त्याने म्हटलं आहे. ललित मोदी म्हणाला की, “खरंच, हा एक अद्भुत दिवस आहे. मी १६ वर्षे लढा दिला. गेल्या अनेक वर्षांत प्रसारमाध्यमांना आणि इतरांना जे काही सांगत आलो, ते अखेर खरं ठरलं आहे. लवादाने माझ्या बाजूने निकाल दिल्याने मला खूप आनंद झाला आहे.” आपल्याला केवळ आयपीएलच्या हिताची काळजी होती आणि त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही, असंही ललित मोदीने त्याच्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.
निकालानंतर ललित मोदीने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपण भारतात परतू शकतो, असं त्याने म्हटलं आहे. दरम्यान, मुलीला ऑक्टोबरमध्ये बाळ होणार आहे. हे सर्वकाही सुरळीत पार पडावे आणि त्यानंतर भारतात परतता यावं, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
२०१० मध्ये भारत सोडला
ललित मोदीने २०१० मध्ये भारत सोडला होता. करचुकवेगिरी, मनी लाँडरिंग आणि प्रसारण करारांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांनंतर तो लंडनला गेला होता. तो आयपीएलचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. दरम्यान, तस्कर आणि परकीय चलन फेरफार करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्ती कायद्या (SAFEMA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाने २००९ मधील आयपीएल दक्षिण आफ्रिका फेमा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) बहुतांश निष्कर्ष आणि दंड रद्द केले आहेत. यामुळे ललित मोदी आणि इतर अपीलकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला.
हे प्रकरण २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलशी संबंधित आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान सुरक्षेच्या कारणांमुळे आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. या प्रकरणात ईडीने आरोप केला होता की, आयपीएल २००९ स्पर्धेसाठी बीसीसीआयने अंदाजे ४९.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर परदेशात पाठवले होते. ही रक्कम भारताबाहेर पाठवण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती, असाही ईडीचा आरोप होता.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा