IND vs ZIM T20 Series : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने नेहमीच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळेत सुरू होणार असून, टीव्हीवर नवीन चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील आणि ओटीटीवर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार, जाणून घ्या.

२३, २५ आणि २६ जुलैला सामने
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २३ जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २५ जुलैला, तर तिसरा सामना २६ जुलैला खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने अवघ्या काही दिवसांच्या अंतराने होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला सलग सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असेल.
दुपारी ४.३० वाजता सुरू होणार सामना
या मालिकेतील सामन्यांच्या वेळेतही मोठा बदल करण्यात आला आहे. भारतात टी-२० सामने साधारणपणे संध्याकाळी किंवा रात्री खेळवले जातात. मात्र, भारत-झिम्बाब्वे मालिकेतील सामने दुपारी सुरू होणार आहेत. मालिकेतील प्रत्येक सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता होईल. त्यानंतर ४.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांसारखे खेळाडू दुपारी ४.३० वाजल्यापासून मैदानात खेळताना दिसणार आहेत.
ना स्टार स्पोर्ट्स, ना सोनी, ना जिओ हॉटस्टार
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेचं थेट प्रक्षेपण नेहमीच्या स्पोर्ट्स चॅनेलवर होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. स्टार स्पोर्ट्स किंवा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सामने पाहता येणार नाहीत. तसंच, जिओ हॉटस्टारवरही या मालिकेचं थेट प्रक्षेपण होणार नाही. या मालिकेसाठी एका नव्या स्पोर्ट्स चॅनेलची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सामने पाहणाऱ्या चाहत्यांना यावेळी वेगळ्या चॅनेलवर जावं लागणार आहे.
नवीन चॅनेलवर फ्रीमध्ये पाहता येणार सामने
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेचं टीव्हीवर थेट प्रक्षेपण युनाइट ८ स्पोर्ट्स टीव्ही या चॅनेलवर होणार आहे. या चॅनेलवर सामने पाहण्यासाठी चाहत्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे टीव्हीवर टीम इंडियाचे सामने पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी हा एक पर्याय असेल.
मोबाइल आणि लॅपटॉपवरही पाहता येणार
ज्या चाहत्यांना टीव्हीऐवजी मोबाइल, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर सामने पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी फॅनकोड हा पर्याय उपलब्ध असेल. फॅनकोडच्या माध्यमातून या मालिकेतील सामन्यांचं ओटीटीवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
दरम्यान, या मालिकेत वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर विशेष लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध चांगली कामगिरी करून मालिकेत विजय मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

