Headlines

रेवस-रेड्डी किनारी महामार्गासाठी महत्त्वाचा दुवा; सागरी पुलाचं काम सुरू; जंजिरा, दिवेआगर गाठणं सोपं होणार } Maharashtra Times


Konkan Sea Bridge: रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महत्त्वाचा ठरणार असलेला टोकेखार-तुरुंबाडी सागरी पुलाचं काम सध्या वेगाने सुरू आहे. कोकण किनारपट्टीवर वेगवान वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.

कोकण गाठणं सोपं होणार
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी टोकेखार-तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. आगरदांडा खाडीवरील या पुलाच्या खाडीतील खांबांचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पाहिलेले कोकणातील सागरी महामार्गाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि म्हसळा हे दोन महत्त्वाचे तालुके थेट जोडले जाणार आहेत. समुद्रात उभे राहिलेले खांब आणि सुरू असलेले ‘कॅपिंग बीम’चे काम पाहता हा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

Maharashtra TimesPurandar International Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी विशेष मोहीम, शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवणार; एक हजार कोटींच्या निधीचे वाटप पूर्ण

८०९ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

सुमारे ८०९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे बांधकाम एचसीसी इंडिया कंपनीमार्फत करण्यात येत आहे. जानेवारी २०२६ पासून कामाला विशेष गती मिळाल्याने आता पुलाचा आकार स्पष्टपणे दिसू लागला आहे. समुद्रातील अनेक खांब पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पुलासोबत दोन्ही बाजूंना अॅप्रोच रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री, अभियंते आणि तांत्रिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

सध्या मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन आणि दिघी परिसरात प्रवासासाठी खाडीभोवती मोठा वळसा घालावा लागतो किंवा फेरीबोट सेवेवर अवलंबून राहावे लागते. मात्र हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही दिलासा मिळणार आहे. या पुलामुळे दिघी बंदरापर्यंतची मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. परिणामी औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ले, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन यांसारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट, वाहतूक आणि मत्स्यव्यवसायाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकरी कुटुंबांतील बेरोजगार तरुणांना प्राधान्याने रोजगार देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्यास या प्रकल्पाचा लाभ सगळ्यांनाच मिळेल.

Maharashtra TimesThane-Airoli Creek Bridge: ठाणे ते ऐरोली सहा पदरी खाडीपूल बांधणार, प्रवासात 30 मिनिटं वाचणार; MMRDAचा नवा प्लॅन काय?

किनारी महामार्गासाठी महत्त्वाचा दुवा

रेवस ते रेड्डी या प्रस्तावित किनारी महामार्गाच्या दृष्टीने टोकेखार-तुरुंबाडी सागरी पूल हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. कोकण किनारपट्टीवर सलग आणि वेगवान वाहतूक साखळी उभारण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक भूमिका बजावणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा