Headlines

राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम:22 ऑगस्टला विद्यार्थिनींशी संवाद साधणार, तयारी अंतिम टप्प्यात




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सायंकाळी पाच वाजता एसएसपीएम मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या तयारीची माहिती दिली. या कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, विद्यार्थिनींची सुरक्षा, समान संधी आणि निर्णयप्रक्रियेतील महिलांचा सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ‘छात्रों की गूंज’ हा उपक्रम काँग्रेसने देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरू केला आहे. पुण्यातील हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनी आणि युवतींसाठी आयोजित करण्यात आला असून, राहुल गांधी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी यावेळी युवतींना शिक्षण आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधी मिळत असल्याचा आरोप केला. परीक्षा पद्धतीतील त्रुटी, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरुणांच्या या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या आवाजाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, अशा अडथळ्यांमुळे कार्यक्रम थांबणार नसून तो नियोजित वेळेतच होईल, अशी ठाम भूमिका पक्षाने घेतली आहे. पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा सखोल आढावा घेतला आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि युवतींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत