Nishan Madushka Injury, India Sri Lanka 1st Test : गॉल येथे सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या एका जोरदार स्वीप शॉटमुळे एक खेळाडू गंभीर जखमी झाला आहे. चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळल्याने त्याला तातडीने मैदानाबाहेर जावे लागले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गॉल येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला सावध आणि चांगली सुरुवात करून दिली. मात्र, सामन्याच्या सुरुवातीलाच मैदानावर एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय डावादरम्यान केएल राहुलने मारलेला एक कडक शॉट थेट श्रीलंकेचा क्षेत्ररक्षक निशान मदुष्का याच्या हेल्मेटवर आदळला, ज्यामुळे तो जखमी झाला.
ही घटना डावाच्या १० व्या षटकात घडली. श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर केएल राहुलने एक जोरदार स्वीप शॉट खेळला. त्यावेळी निशान मदुष्का शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. राहुलने मारलेला शॉट इतका वेगवान होता की मदुष्काला स्वतःला सावरण्याची पुरेशी संधीच मिळाली नाही. त्याने केवळ आपले डोके खाली झुकवले आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटच्या मध्यभागी आदळून फाईन लेगच्या दिशेने गेला.
हा अपघात घडल्यानंतर राहुल सुरुवातीला धाव घेण्यास कचरत होता, पण दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वाल आधीच धावला असल्याने त्याला धाव पूर्ण करावी लागली. धाव पूर्ण करताच राहुलने तात्काळ मदुष्काकडे धाव घेत त्याची विचारपूस केली. या घटनेनंतर श्रीलंकेच्या संघाचे फिजिओ तातडीने मैदानात आले आणि त्यांनी मदुष्काची कन्कशन टेस्ट (Concussion Test) केली. थोडा वेळ तपासणी केल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मदुष्काला मैदानाबाहेर नेण्यात आले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
निशान मदुष्का हा श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ६६ आणि ६३ धावांची शानदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत १२ कसोटी सामन्यांमध्ये ६२२ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या नियमांनुसार, सामन्यात एखाद्या खेळाडूला मानेच्या वर किंवा डोक्याला दुखापत झाल्यास संघाला कन्कशन सबस्टिट्यूटचा (बदली खेळाडू) पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे जर मदुष्का फलंदाजीसाठी तंदुरुस्त नसेल, तर श्रीलंकेच्या संघाला त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या फलंदाजाला खेळवण्याची मुभा मिळू शकते.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा