Headlines

युवकांच्या कलागुणांचा जल्लोष सावंतवाडीत; मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्टला


सावंतवाडी/वार्ताहर : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे उत्साहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार असून संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा विविध विभागांतील स्पर्धांमधून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज आणि मातीशिल्प अशा विविध स्पर्धा महोत्सवात रंगणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा प्रतिष्ठेचा उपक्रम असल्याचे सांगत, विभागीय फेरीतील उत्कृष्ट स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचेही डॉ. बाणे यांनी नमूद केले.

सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी व कागदपत्र पडताळणी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मुख्य स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० ते रात्री ९.३० या वेळेत पार पडतील. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत