Headlines

युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिपसाठी संघाची घोषणा


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हॉकी इंडियाने मंगळवारी मस्कत येथे 20 ते 25 जुलै दरम्यान होणाऱ्या पहिल्या ‘युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिप’साठी भारतीय उपकनिष्ठ पुरुष आणि महिला संघांची घोषणा केली.

ही स्पर्धा विशेष महत्त्वाची आहे, कारण ती पहिल्या एफआयएच 18 वर्षांखालील युथ हॉकी 5 विश्वचषकासाठी अधिकृत आशियाई पात्रता फेरी म्हणून काम करेल. या स्पर्धेत आशियातील सर्वोत्तम उदयोन्मुख हॉकी खेळाडूंचा सहभाग असेल आणि दोन्ही गटांत प्रत्येकी सात संघ स्पर्धा करतील. पुरूष गटात यजमान ओमानसह भारत, पाकिस्तान, इराण, इराक, सौदी अरेबिया आणि बांगलादेश हे संघ असतील तर महिला गटात भारत, पाकिस्तान, ओमान, चीन, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि इराण हे संघ खेळताना दिसतील. भोपाळ (महिला) आणि चंदीगड (पुरूष) येथे सध्या सुरू असलेल्या दोन राष्ट्रीय शिबिरांमधील प्रत्येकी 15 खेळाडूंच्या गटातून हे भारतीय संघ निवडण्यात आले आहेत.

10 खेळाडूंच्या महिला संघात गोलकीपर खिली कुमारी आणि महक परिहार यांचा समावेश आहे. बचावाची जबाबदारी निलम टोपनो आणि किरण एक्का सांभाळतील. तर दिया, पुष्पा मांझी आणि श्रुती कुमारी मिडफिल्ड फळीत असतील. फॉरवर्ड फळीत नौशीन नाझ, संदीप कुमारी आणि स्वीटी कुजुर यांचा समावेश आहे. स्वीटी कुजूर संघाचे नेतृत्व करेल. पुरूष संघात गोलकीपर सावन कुमार आणि आयुष रजक यांचा समावेश असून करण गौतम आणि आशिष तानी पूर्ती हे दोन डिफेंडर आहेत. मिडफील्ड फळीत राहुल यादव, रोमिस पाल आहेत. तर फॉरवर्ड फळीत कर्णधार केतन कुशवाह, प्रल्हाद राजभर, अर्शदीप सिंग आणि शाहरूख अली यांचा समावेश आहे.

संघाच्या निवडीबाबत बोलताना उपकनिष्ठ महिला संघाची प्रशिक्षक राणी म्हणाली, ‘आम्ही कौशल्य, वेग आणि जिद्द यांचा चांगला मेळ असलेला संतुलित संघ निवडला आहे. खेळाडूंनी तयारीच्या शिबिरात अत्यंत कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आपल्या खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठी निष्ठा दर्शविली आहे. हॉकी 5-एस हा वेगवान प्रकार आहे. ज्यासाठी त्वरित निर्णयक्षमता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रचंड उर्जेची आवश्यकता असते. आम्ही आमच्या तयारीदरम्यान या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. ही स्पर्धा आमच्या तरुण खेळाडूंसाठी आशियातील काही सर्वोत्तम संघांविरुद्ध स्वत:ला आजमावण्याचे एक मौल्यवान व्यासपीठ ठरेल. ते या आव्हानाचा स्वीकार करतील. निर्भयपणे हॉकी खेळतील आणि अभिमानाने भारताचे प्रतिनिधीत्व करतील, याची आम्हाला खात्री आहे,’ असे त्या म्हणाल्या.

उपकनिष्ठ पुरुष संघाचे प्रशिक्षक सरदार सिंग यांनी ओमानमध्ये संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रशिक्षण शिबिरातील कठोर परिश्रमांमुळे या संघाने आपले स्थान मिळविले आहे. हॉकी 5 हा एक रोमांचक प्रकार आहे. ज्यात वेग, कल्पकता आणि दबावाखाली संयम राखणे या गोष्टींना महत्त्व असते आणि या मुलांनी या खेळाच्या वैशिष्ट्यापूर्ण गरजांशी उत्तम जुळवून घेतले आहे.

उपकनिष्ठ महिला संघ : गोलरक्षक-खिली कुमारी, महक परिहार, बचावपटू-निलम टोपनो, किरण एक्का, मध्यरक्षक- दिया, पुष्पा मांझी, श्ा़dरुती कुमारी, आक्रमक फळी-नौशीन नाझ, संदीप कुमारी, स्वीटी कुजूर (कर्णधार).

उपकनिष्ठ पुरूष संघ : गोलरक्षक-सावन कुमार, आयुष रजक, बचावपटू-करण गौतम, आशिष तानी पूर्ती, मध्यरक्षक-राहुल यादव, रोमित पाल, आक्रमक फळी-केतन कुशवाह (कर्णधार), प्रल्हाद राजभर, अर्शदीप सिंग, शाहरुख अली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत