वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : फ्रान्सचा दिग्गज खेळाडू किलियन एमबाप्पेच्या नेतृत्वाखालील आक्रमक त्रिकुटापेक्षा स्पेनची भक्कम बचावफळी आणि आत्मविश्वास भारी ठरला. या कामगिरीच्या जोरावर 2010 च्या विजेत्या स्पेनने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या फ्रान्सविऊद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेनने 2-0 असा विजय मिळवला.

यामालच्या उत्कृष्ट खेळामुळे प्रतिस्पर्ध्याकडून ‘फाऊल’ घडला आणि त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर मिकेल ओयारझाबलने गोल केला. त्यानंतर पेद्रो पोरोने आणखी एक गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचविले. पोरो आणि डॅनी ओल्मो यांच्यातील चेंडूची देवाणघेवाण करण्याच्या चालीमुळे स्पेनला 2-0 अशी आघाडी मिळाली. त्यानंतर थोड्याच वेळाने 19 व्या वाढदिवसानंतरच्या दुसऱ्या दिवशी यामालला गोल करण्यापासून रोखले गेले. पंचांनी त्याला ’ऑफसाइड’ ठरवले. मात्र एका अनुभवी बचावपटूविऊद्ध यामालने केलेल्या हुशार खेळीमुळेच स्पेनला सुऊवातीची आघाडी मिळाली.
रविवारी न्यूयॉर्क शहराच्या पलीकडे असलेल्या ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथे स्पेनचा सामना गतविजेता अर्जेंटिना किंवा इंग्लंड यांच्याशी होईल. सलग तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तिसरा संघ बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्रान्सला आता शनिवारी मियामी गार्डन्स, फ्लोरिडा येथे तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळावा लागेल.

22 व्या मिनिटाला ओयारझाबलने पेनल्टी किक हाणली. त्याआधी बचावपटू लुकास डिग्नेने यामालला फाऊल केले होते. डोक्याने चेंडू नियंत्रित करण्यात चूक झाल्यानंतर डिग्ने चेंडू दूर सारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाच यामालने मागून धावत येत पेनल्टी क्षेत्रात आव्हान निर्माण केले. हवेत उडी मारणाऱ्या या किशोरवयीन खेळाडूच्या कोपराला चेंडू लागला आणि त्यानंतर डिग्नेची त्याला लाथ बसली. ओयारझाबलचा या वर्षीच्या विश्वचषकातील हा पाचवा गोल होता
दुसऱ्या गोलच्या वेळी पोरो मोकळी जागा शोधून पुढे सरसावला आणि त्याला ओल्मोकडून ‘बॅक-पास’ मिळाला. ओल्मोने हा पास देण्यापूर्वीच बचावपटू दायोत उपमेकानोच्या धक्क्यामुळे तोल जाऊन तो खाली पडला होता. पहिल्या सत्रात स्पेनला गोल करण्याच्या आणखी दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. आठव्या मिनिटाला ओल्मोविऊद्ध फाऊल केल्यामुळे अॅड्रियन राबिओला पिवळे कार्ड मिळाले आणि त्यानंतर ‘बॉक्स’च्या अगदी बाहेरून स्पेनला ’फ्री-किक’ मिळाली. पण अॅलेक्स बाएनाने मारलेला फटका थेट फ्रेंच खेळाडूंच्या भिंतीवर जाऊन आदळला.
38 व्या मिनिटाला फ्रान्सचा गोलरक्षक माईक मेगनने चेंडू दूर सारताना दिलेला पास थेट बाएनाकडे गेला. त्यानंतर काही जलद पासेसची देवाणघेवाण झाल्यानंतर फॅबियन ऊईझने अगदी जवळून फटका मारला, परंतु उपमेकानोने चपळाईने बचाव करत तो प्रयत्न हाणून पाडला.
स्पेनची नियमित वेळेत अपराजित राहण्याची मालिका 37 सामन्यांवर
बेल्जियमविऊद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर फ्रान्सने सावध राहण्याची गरज असल्याचे यामालने त्वरित निदर्शनास आणून दिले होते. स्पेन हा असा संघ आहे ज्याला खेळावर आणि चेंडूवर नियंत्रण ठेवणे आवडते आणि आम्ही त्यांना तसे करू दिले, असे एमबाप्पे म्हणाला. त्याचे तिन्ही फटके गोलच्या दिशेने अचूक बसले नाहीत. या विश्वचषक मोहिमेमुळे मार्च, 2024 पासून नियमित वेळेत अपराजित राहण्याची स्पेनची मालिका 37 सामन्यांपर्यंत (28 विजय आणि नऊ बरोबरी) पोहोचली आहे. यामुळे 2007-09 दरम्यान नोंदला गेलेला सलग 35 सामने अपराजित राहण्याचा देशाचा जुना विक्रम मोडला गेला आहे.
सातपैकी सहा सामन्यांत स्पेनने स्वीकारलेले नाहीत गोल
या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून रोखण्याचा विक्रम स्पॅनिश संघाने केला आहे. फ्रान्सने स्पेनची भीती बाळगली पाहिजे, असे किशोरवयीन खेळाडू लामिन यामालने केलेले विधान अगदी योग्य ठरले.
विश्वचषक – कोट
या टप्प्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण होते, पण आम्हाला आणखी काही तरी साध्य करायचे आहे. आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा आहे.
– रोद्री, स्पेन
