Headlines

Uddhav Thackeray Matoshree Meeting with Nashik Corporators assures loyalty; वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ


Uddhav Thackeray Nashik Corporator Meeting :एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला.

Uddhav Thackeray Nashik Corporators Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चेनंतर १५ पैकी १४ नगरसेवकांनी मुंबईतील मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ंसमोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरे यांनीही दिला. यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची सर्व नगरसेवकांनी ग्वाही दिली.

राजकीय चर्चांना ‘मातोश्री’वरील बैठकीतून उत्तर

‘ ऑपरेशन टायगर ’अंतर्गत नाशिक महापालिकेतील १५ पैकी १२ नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. त्यामुळे काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना बुधवारी (दि.१५) ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाशिकच्या नगरसेवकांशी पाऊण तास चर्चा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करून सुमारे पाऊण तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, गटनेते केशव पोरजे यांच्यासह १४ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेविका मंगला आढाव प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने पुत्र रोशन आढाव बैठकीला उपस्थित होते.
Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा

‘एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही’

जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व माजी खासदार विनायक राऊत हेही बैठकीला उपस्थित होते. गटनेते केशव पोरजे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी, ‘आम्ही पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत, एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली. प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र संवाद साधून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौरपद आणि पाच कोटींच्या आमिषाबाबत नगरसेवकांनी माहिती दिली. हा प्रकार गंभीर असून, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.

Nashik Operation Tiger | नाशकातील १५ नगरसेवक मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी घेतला कुंभमेळाव्याचा आढावा

‘एकनिष्ठतेचे फळ नक्कीच मिळेल’

नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन केले. ‘एकनिष्ठतेचे फळ नक्कीच मिळेल असा विश्वास दिला. पक्षाचा प्रतिकूल काळ लवकरच संपेल. चांगले दिवस पुन्हा येतील. कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी जनतेशी बांधिलकी ठेवावी,’ अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांचे मनोबल वाढविले. विकासनिधी हा जनतेचा अधिकार असल्याचे सांगत समान वागणुकीसाठी आवश्यक असेल तर न्यायालयातही जा, कायदेशीर लढ्यात तुमचा विजय होईल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
Maharashtra TimesJayant Patil : भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण

‘सिंहस्थ कामांची करणार पोलखोल’

या बैठकीत राजकीय घडामोडींबरोबरच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरही चर्चा झाली. शहरात सुरू असलेल्या सिंहस्थ विकासकामांबाबत नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. कोट्यवधींचा सार्वजनिक निधी वाया जाऊ नये, यासाठी प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेण्याचा सल्ला देतानाच लवकरच नाशिक दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या दौऱ्यात सिंहस्थ कामांची पाहणी करून पोलखोल करणार असल्याचाही इशारा देण्यात आला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा