मांद्रे पोलिसांची अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई : दोन सेनेगाली नागरिकांसह तिघांना अटक
त. भा. प्रतिनिधी
पेडणे : मांद्रे पोलिसांनी अमलीपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मोरजी येथील बांदेकरवाडा परिसरातील गेस्ट हाऊसवर छापा टाकून दोन सेनेगलच्या नागरिकांसह एकूण तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 222.92 ग्रॅम वजनाचा कोकेनसदृश पांढऱ्या रंगाचा पावडर पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 22 लाख 29 हजार 200 ऊपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बौबा सांबा (वय 31) हा सेनेगलचा नागरिक असून तो सध्या ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊस, बांदेकरवाडा, मोरजी येथे राहत होता. त्याच्यासोबत अलिऊ मुस्ताफा (वय 31) या आणखी एका सेनेगाली नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले. तोही याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान संशयितांकडे त्यांच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या ठेवलेला पांढऱ्या रंगाचा पावडरसदृश पदार्थ आढळून आला. हा पदार्थ कोकेन असल्याचा संशय असून त्याचे एकूण वजन 222.92 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या संशयित अमलीपदार्थाची अंदाजे किंमत रु 22,29,200 इतकी आहे. या अमली पदार्थासोबतच पोलिसांनी संशयितांकडून रु. 10,85,300 ऊपयांची रोकड तसेच इतर साहित्यही जप्त केले. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे रु 33,14,500 असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मांद्रे पोलिसांनी रविवारी 23 रोजी पहाटे कारवाई केली.
ही कारवाई मांद्रे पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक कृणाल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्रीपासून रविवावारी पहाटेपर्यंत केली. उपनिरीक्षक परेश काळे यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.
