पर्वरी पोलिसांनी केली कारवाई
त. भा. प्रतिनिधी
पणजी : राज्यात जॉब स्कॅम प्रकरणे उघड होत असून पर्वरी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. संशयित महिलेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(2) अंतर्गत फसवणुकीची तक्रार नोंद केली आहे. याबाबत सुकुर येथील संतोष वळवईकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित महिलेचे नाव काजल प्रकाश नानोस्कर (25 वर्षे, हरमल) असे आहे. संशयित महिलेने तक्रारदाराच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो ऊपये घेतले होते. मात्र कित्येक महिने उलटले तरी सरकारी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदाराने पैसे परत मागितले. संशयित महिलेने अर्धे पैसे परत दिले आणि उर्वरित रक्कम देण्यास चालढकल सुरु केली. त्यामुळे तक्रारदाराने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तिला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिलेने अनेकांना गंडा घातला आहे. कुणाला जमीन देते म्हणून सांगून पैसे उकळले आहेत, तर काहीजणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतले आहेत. पर्वरी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे प्रकार उघडकीस आले असून आज तिला न्यायालयात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास केला जाईल. पर्वरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
