सात दिवसात मागितले उत्तर : बाल लैंगिक शोषणसंबंधी जाहिरातींप्रकरणी विचारणा
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सरकारने मूळ कंपनी ‘मेटा’ला नोटीस बजावली आहे. कंपनीला या नोटीसवर आगामी 7 दिवसांत प्रतिसाद देणे बंधनकारक आहे. ही नोटीस 4 जुलै रोजी बजावण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्टाग्रामला आपल्या प्लॅटफॉर्मवरील बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा अशा सामग्रीपर्यंत पोहोचण्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या सर्व जाहिराती तात्काळ ब्लॉक करून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. इन्स्टाग्राम भारतात बाल लैंगिक शोषणाशी संबंधित जाहिराती दाखवत होते. यापूर्वी, 1 जुलै रोजी सरकारने व्हॉट्सअॅपच्या युझरनेम फीचरसंदर्भात मेटाला नोटीस बजावली होती.
