मालवण : सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र असलेल्या मालवण शासकीय रुग्णालयातील गैरसोयींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील तब्बल 12 दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्याने महिला रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
एक्स-रे तपासणी ही विविध आजार आणि दुखापतींचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक असते. मात्र तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना तपासणीसाठी खासगी रुग्णालये किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जाण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने गर्भवती महिला तसेच स्त्रीरोगाशी संबंधित रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित तपासणी आणि उपचार वेळेत मिळणे आवश्यक असताना तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता चिंताजनक असल्याचे मनसेने नमूद केले.
“शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेचे हक्काचे उपचार केंद्र आहे. येथे येणाऱ्या रुग्णाला सुविधा मिळत नसतील आणि त्याला खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत असेल, तर ही केवळ गैरसोय नसून त्यांच्या अडचणीत भर घालणारी बाब आहे,” अशी भूमिका मनसेने मांडली.
मागील 12 दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध का नाही, याचे प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. एक्स-रे तंत्रज्ञ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ यांची तातडीने नियुक्ती किंवा उपलब्धता करून रुग्णांची गैरसोय दूर करावी. तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली.
रुग्णांच्या आरोग्याचा थेट संबंध असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने डॉक्टर आणि तंत्रज्ञ उपलब्ध करून प्रत्यक्ष दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
