Headlines

महावितरणचा उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात:सोलर रिलीज ऑर्डरसाठी घेतली एक हजार रुपयांची लाच




धामणगाव रेल्वे येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, बुधवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आली, ज्यामुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. राहुल निळकंठ उमरे (वय ४९) असे अटक केलेल्या उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याने सोलर पॅनलच्या ‘रिलीज ऑर्डर’सह इतर कामांसाठी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने संबंधित ग्राहकाला बराच त्रास दिला होता. या प्रकरणातील तक्रारदार हे सोलर पॅनल बसवण्याचे काम करतात. त्यांना ८ मे २०२६ रोजी एका ग्राहकाकडे सोलर पॅनल बसवण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली होती, परंतु ‘रिलीज ऑर्डर’ निघाली नव्हती. तक्रारदाराने याबाबत राहुल उमरे यांच्याकडे वारंवार विचारणा केली. १७ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा विचारणा केली असता, मीटर ‘रिलीज ऑर्डर’ काढण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार, आज बुधवारी सायंकाळी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकार्यकारी अभियंता राहुल उमरे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात दत्तापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगीता ठाकरे, पोलीस निरीक्षक निलीमा सातव, सुजाता बन्सोड, पोलीस कर्मचारी सुधीर चर्जन, प्रमोद रायपुरे, उपेंद्र थोरात आणि सचिन अठुर यांच्या पथकाने केली. आरोपी राहुल निळकंठ उमरे हा मूळचा नागपूर येथील प्लॉट नंबर २३२, विश्राम नगर, सुगतनगरजवळचा रहिवासी आहे. सध्या तो अमरावती येथील चैतन्य कॉलनीमध्ये भाड्याने राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत