Headlines

10 विकेट्स, विक्रमांची रास, तरी सामनावीर पुरस्कार पडिक्कलला; मानव सुथारसोबत अन्याय झाला?


Manav Suthar Records, IND vs SL : गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव केला. देवदत्त पडिक्कल सामनावीर ठरला, पण मानव सुथारने सामन्यात १० विकेट्स घेत दुसऱ्याच कसोटीत मोठा पराक्रम केला. त्याने अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केले.

Manav Suthar Records
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेचा १६५ धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. विजयासाठी दिलेल्या ३७२ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसला आणि अवघ्या २०६ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात १६७ धावांची बहुमूल्य खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, या विजयाचा खरा नायक ठरला तो युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार , ज्याने आपल्या भन्नाट फिरकीच्या जोरावर ऐतिहासिक विक्रम रचले आहेत.

पडिक्कलची फलंदाजी अन् सुथारची फिरकी ठरली घातक

भारतीय संघाच्या विजयाचा भक्कम पाया पहिल्या डावात देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावांच्या मॅरेथॉन खेळीने रचला गेला होता, ज्यामुळे तो सामनावीर पुरस्काराचा मुख्य मानकरी ठरला. पण सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने झुकवण्यात मानव सुथारचे योगदानही तितकेच मोठे आणि निर्णायक होते.

Maharashtra TimesIND vs SL : भारताकडून १६५ धावांनी पराभव; श्रीलंकेच्या हातून कुठे निसटली मॅच? भावुक कॅप्टन डी सिल्वाने सगळं सांगितलं
सुथारने या सामन्यात एकूण १० बळी (पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स) घेतले. त्याच्या भेदक आणि वळण घेणाऱ्या चेंडूंसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे खचलेले दिसले. दुसऱ्या डावात श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झाली होती की त्यांचे तब्बल चार फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. केवळ सोनल दिनुषा (८४) आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा (५९) यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला.

मानव सुथारच्या नावावर नोंदवले गेले ‘हे’ ऐतिहासिक विक्रम

सर्वात कमी सामन्यांत १० बळी

मानव सुथार आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात १० बळी घेणारा भारताचा संयुक्तपणे दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अक्षर पटेल आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत पदार्पणाच्या सामन्यात १६ बळी घेणारे नरेंद्र हिरवाणी अव्वल स्थानावर आहेत.

Maharashtra TimesIndia vs Sri Lanka Test : श्रीलंकेला घरच्या मैदानावर 165 धावांनी लोळवलं; टीम इंडियाला WTCमध्ये मोठा फायदा, फायनलसाठी आता काय करावं लागेल?

परदेशी भूमीवरील सर्वात युवा भारतीय फिरकीपटू

वयाच्या अवघ्या २४ वर्षे आणि १६ व्या दिवशी परदेशी भूमीवर कसोटी सामन्यात १० बळी घेणारा मानव सुथार हा पहिलाच युवा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

दिग्गजांच्या ‘खास’ क्लबमध्ये एन्ट्री

श्रीलंकेविरुद्ध एका कसोटी सामन्यात १० बळी घेणारा तो केवळ सहावा भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी ही ऐतिहासिक कामगिरी केवळ अनिल कुंबळे, हरभजन सिंग, मनिंदर सिंग, वेंकटपती राजू आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्याच नावावर होती, आता या खास पंगतीत सुथारनेही स्थान मिळवले आहे.