सातारा -सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धामुनसेवाडी, कासवंड येथे रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत बिबट्याने थेट घरात घुसून कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केल्याची घटना घडली.
यावेळी घरामध्ये जेवणासाठी बसलेले शेतकरी कुटुंब अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरून गेले. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.राजाराम बबन धामुनसे यांनी वन विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, परिसरातील पाळीव प्राणी, कोंबड्या, कुत्री, बकऱ्या, शेळ्या आणि जनावरांवर वारंवार हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या वतीने वन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
