![]()
सातारा तालुक्यातील भैरवगड टोळेवाडी येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची घरे मिळावीत आणि त्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश तातडीने जारी करावा, या मागणीसाठी भूस्खलनग्रस्तांनी बुधवार दि. ५ ऑगस्टपासून गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे. पुनर्विकास संस्था, टोळेवाडी भैरवगड यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या भूस्खलनानंतर बाधित कुटुंबे गेली सात वर्षे कायमस्वरूपी निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. १ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने पुनर्वसनास मान्यता दिली असली, तरी प्रशासकीय कार्यवाहीतील दिरंगाई, वारंवार त्रुटी काढणे आणि फाईल प्रक्रिया रखडल्यामुळे आजतागायत प्रत्यक्ष पुनर्वसन झालेले नाही. निवेदनात प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, सातत्याने पाठपुरावा, बैठका आणि निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायमस्वरूपी घर नसल्याने भूस्खलनग्रस्त कुटुंबांना अनेक अडचणी आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यापार्श्वभूमीवर, पुनर्वसनासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अध्यादेश प्राप्त होत नाही तोपर्यंत भैरवगड टोळेवाडी येथे आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार भूस्खलनग्रस्तांनी व्यक्त केला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे आंदोलन शांततेच्या व अहिंसक लोकशाही मार्गाने सुरू असून, तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी भूस्खलनग्रस्तांनी केली आहे.
Source link
भूस्खलनग्रस्तांचे घरांसाठी आमरण उपोषण:7 वर्षांपासून कायमस्वरूपी निवाऱ्याची प्रतीक्षा, साताऱ्याच्या भैरवगड टोळेवाडीतील ग्रामस्थांची व्यथा
