Headlines

फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणार का?:उद्धव ठाकरे म्हणाले – आधी त्यांनी जाहीर करावे, पण असे केल्यास ते पक्षात राहतील का?




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. आज शिर्डीत पत्रकारांनी त्यांना फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले, आधी फडणवीसांनी जाहीर करावे की, ते पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत. पण त्यांनी आपली भूमिका मांडल्यास ते पक्षात राहतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्धव ठाकरे मागील तीन दिवसांपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आक्रमक दौरे करत आहेत. आज शिर्डीत शिवसैनिकांशी संवाद साधण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘डिलिमीटेशन बिल’ (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवरून भाजपवर जोरदार शरसंधान केले. नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे? पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवले. ते म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याची मनापासून काळजी वाटते. मी हे केवळ वरवर किंवा चेष्टा-मस्करी म्हणून बोलत नाहीये. महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने देशपातळीवर नेतृत्व करण्याचे किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले, तर त्यात काहीही गैर नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, “यापूर्वी भाजपमधून नितीन गडकरी यांचे नाव या शर्यतीत घेतले जात होते. गडकरींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोठा पाठिंबा होता, मात्र त्यांना काही कारण नसताना बाजूला सारून बदनाम करण्यात आले. आता देवेंद्र फडणवीस हा एक चांगला आणि सक्षम चेहरा समोर आहे. फडणवीस यांनाही संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे माझ्या कानावर आले आहे. म्हणूनच, संघाचा पाठिंबा असलेला हा मराठी माणूस उद्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊच नये, म्हणून हे सगळे अंतर्गत कारस्थान चालले आहे की काय? अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे.” नरसिंहरावांचे दिले उदाहरण उद्धव ठाकरे म्हणाले, “नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले, त्याच्या आधी ते महाराष्ट्रातील रामटेकमधून निवडणूक लढवायचे. परंतु, जेव्हा ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशातील नंद्याळमध्ये गेले. त्यावेळी तिथे कट्टर काँग्रेस विरोधक एन. टी. रामाराव हे मुख्यमंत्री होते. त्यांनी अशी भूमिका घेतली की, माझा आंध्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी त्याच्याविरोधात लढणार नाही. जवळपास साडेपाच लाखाच्या मताधिक्क्याने नरसिंहराव विजयी झाले होते. इतर राज्य अन् प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील, तर महाराष्ट्राने अभिमान का बाळगू नये. अशा फोडाफोडीने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यात येत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्राने एकवटले पाहिजे.” फडणवीस पंतप्रधान झाल्यास पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास त्यांना पाठिंबा देणार का‌? असे उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, “आधी फडणवीस यांनी आज तसे जाहीर करावे. महाराष्ट्राचा कोणीही माणूस पंतप्रधान व्हावा. पण गद्दार सोडून. पण आता जर देवेंद्र फडणवीस यांनी आपले पंतप्रधान पदाची तयार करत असल्याचे मत मांडले, तर ते पक्षात राहतील का? त्यांनी आता जाहीर करणे म्हणजे आत्मघात करणे आहे. त्यांनी २०२८-२०२९ वेळी जाहीर केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देईल. महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्ही सोबत राहू. पण गद्दारांसोबत राहणार नाही.” गद्दारांवर बोलण्याची लायकी नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख ‘शहा सेना’ असा केला. “हा गट आता शिवसेना राहिलेला नसून ती ‘शाह सेना’ झाली आहे. त्यामुळे अशा गद्दारांच्या सरदाराबद्दल मला काहीही बोलायचे नाही, ते माझ्या टीकेच्या लायकीचेही नाहीत,” अशा कडक शब्दांत त्यांनी शिंदेंचा समाचार घेतला. डिलिमीटेशन विधेयकावर सरकारला सुनावले खडे बोल अलिकडेच संसदेत मंजूर न झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमीटेशन) विधेयकाबाबत केंद्र सरकारने आपल्याशी किंवा विरोधी पक्षांशी काही संपर्क साधला होता का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत ‘नाही’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, “आमच्याशी कोणताही समन्वय साधण्यात आलेला नाही. आमची भूमिका आजही ठाम आहे की, आम्ही केवळ विरोधी पक्ष नसून कोट्यवधी जनतेचे अधिकृत प्रतिनिधी आहोत.” संसदेत जनतेचे प्रश्न आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. सरकारला सल्ला देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणतेही मोठे विधेयक आणण्यापूर्वी सरकारने सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलावून त्यांना ते समजावून सांगायला हवे. आमच्या काही सूचना किंवा आक्षेप असतील तर त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आज तुम्ही सत्तेत आहात, कदाचित उद्या आम्ही असू आणि तुम्ही विरोधी बाकांवर असाल. त्यामुळे राजकारणापेक्षा समोर ‘देशहित’ असणे सर्वात महत्त्वाचे आहे.” उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत