Headlines

पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा


म.टा.प्रतिनिधी , नागपूर: शहरात मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागांतील पाणी ओसरले असले, तरी महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने बुधवारी पहाटे १ वाजेपर्यंत बचावकार्य आणि पाणी उपसण्याचे काम सुरू ठेवले. मात्र, पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून महापालिका आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. महापालिकेने सुमारे एक हजार घरे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे, तर नगरसेवकांनी पाच हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याचा दावा केला आहे.

महापालिकेतर्फे दावा करण्यात आला

शहरात पावसाचे पाणी साचल्याच्या घटनांनंतर अग्निशमन विभागाने सुमारे १२ तास सलग काम करीत ४५ आपत्कालीन कॉलला प्रतिसाद दिला. यामध्ये पाणी साचल्याच्या २९ तक्रारी, १२ बचाव मोहिमा आणि झाडे कोसळल्याच्या चार घटनांचा समावेश होता. उच्च क्षमतेचे पंप, बचाव नौका आणि इतर आपत्कालीन साहित्याच्या साहाय्याने घरांमधील पाणी बाहेर काढण्यात आले. तसेच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचा दावा, महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

पाणी साचल्याच्या तक्रारीत साधारण ३० ते ४० घरांचा समावेश

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाणी साचल्याच्या प्रत्येक तक्रारीत साधारण ३० ते ४० घरांचा समावेश होता. या आधारे एक हजारांहून अधिक घरे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याने वेढलेल्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली. रस्ते आणि उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी काढून अनेक ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

नरसाळा, हुडकेश्वर, नारा, नारी, गोरेवाडा, स्वावलंबीनगर, खामला तसेच लक्ष्मीनगर विभागातील अनेक वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. याशिवाय दीक्षाभूमी परिसर, गोपाळनगर, सहकारनगर, पडोळे चौक, संभाजी चौक आणि गायत्रीनगरसारख्या उच्चभ्रू भागांनाही पुराचा फटका बसल्याचे समोर आले. त्यामुळे पुराचा धोका केवळ पारंपरिक सखल वस्त्यांपुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

Maharashtra TimesTukaram Mundhe: सकाळी ९ ते रात्री १२ काम, सुट्ट्या बंद! तुकाराम मुंढेंच्या कारभाराविरोधात FDA चे कर्मचारी आक्रमक; उचललं मोठं पाऊल
पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने रस्त्यांवरील चिखल, गाळ आणि कचरा हटविण्याचे काम हाती घेतले. त्याचवेळी अग्निशमन विभागाने रस्ते आणि अंडरपासमधील पाणी उपसून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

पाण्याचा निचरा करणारी प्रणाली अद्ययावत करा

नगरसेवक शैलेश पांडे, दिनेश यादव आणि अभिजित झा यांनी शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था, नैसर्गिक नाले आणि पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणे यांचा सर्वंकष आढावा घेण्याची मागणी केली. दरवर्षी पावसाळ्यात तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी दीर्घकालीन पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिका प्रशासनाने मात्र अल्पावधीत झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने तत्काळ प्रतिसाद दिल्याचा दावा केला आहे. वाढत्या अतिवृष्टीच्या घटनांमुळे नागपूरसाठी कायमस्वरूपी शहरी पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Maharashtra TimesNagpur News: शहर तुंबते याला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाचा महापालिकेला थेट सवाल

महापालिकेच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

दरम्यान, गोरेवाडा, नारा, नारी, नरसाळा आणि हुडकेश्वर परिसरातील नगरसेवकांनी महापालिकेच्या नुकसानीच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अग्निशमन विभागाचा अंदाज केवळ नोंद झालेल्या तक्रारींवर आधारित असून, अंतर्गत वस्त्यांमधील अनेक बाधित घरे त्यात समाविष्ट नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे प्रत्यक्षात सुमारे पाच हजार घरे पाण्यामुळे प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत