![]()
पुणे मनपा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात ठिय्या आंदोलन केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामांची चौकशी करण्याच्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी भाजपने शून्य केल्याचा आरोप करत हा निषेध व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करावी, असा प्रस्ताव दिला होता. यानंतर भाजपने दोन्ही नगरसेवकांचा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी रद्द केला. या कृतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पुणे मनपा येथे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते निलेश निकम, आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ नेते दीपक मानकर, शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक सुहास टिंगरे यांनी सांगितले की, भाजपने त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करणे हा केवळ त्यांच्यावर अन्याय नाही, तर मतदारसंघातील नागरिकांच्या विकासाला खीळ घालण्यासारखे आहे. हा भाजपच्या बहुमताचा जनतेवरील अन्याय असून, जनतेची कामे आगामी काळात कशी मार्गी लागणार, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी मिळवून आता विकास कामे करावी लागतील, असेही ते म्हणाले. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कोणी धमकी देईल, असे जन्माला आले नाही. त्यांचे चंद्रकांत पाटील किंवा कोणत्याही नेत्यावर आरोप नाहीत. त्यांनी केवळ त्यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. केवळ प्रस्ताव दिल्यावर उत्तर देण्याऐवजी मतदारसंघातील निधी शून्य करणे म्हणजे यात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात मनपा आयुक्तांनाही चौकशीचे लेखी पत्र देण्यात आले आहे. भाजप गटनेते सांगतात की, महायुती मनपात नाही, तर केवळ राज्यात राहील, असेही बालवडकर यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांनी सांगितले की, मागील ४० वर्षांपासून ते मनपात काम करत आहेत आणि असा प्रकार कधी घडलेला पाहिला नाही. शिवस्मारकाला देखील गुंडाळण्याचे काम भाजपने संबंधित मतदारसंघात केले आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नगरसेवकांना मतदारसंघात निधी न देणे म्हणजे अन्याय आहे. केवळ निवडणुकीपुरते मित्र पक्षांचा वापर करणे हे भाजपचे धोरण असल्याचे यातून दिसून येते, असे मानकर म्हणाले.
Source link
पुणे मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपविरोधात ठिय्या आंदोलन:आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामांच्या चौकशीमुळे विकास निधी शून्य केल्याचा निषेध
