Headlines

न भिजवता,न वाटता! 5 मिनिटांत कुकरमध्ये बनवा उपवास स्पेशल साबुदाण्याचे पॉपकॉर्न 1 वेळा बनवा,वर्षभर खा! – how to make sabudana popcorn recipe shared by cook with disha


साबुदाण्याचे पॉपकॉर्न कधी खाल्ले आहेत का? न भिजवता आणि न वाटता बनणारी ही कुरकुरीत व्रतस्पेशल रेसिपी आहे.एकदा बनवून व्यवस्थित वाळवून ठेवा आणि वर्षभर हवे तेव्हा तळून खमंग पॉपकॉर्नचा आस्वाद घ्या.चला तर मग, झटपट आणि सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पॉपकॉर्न कसे बनवायचे ते पाहूया!

Sabudana Snack Recipe
फोटौ सौजन्य :- @Cook with Disha 78
साबुदाणा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खीर येते. पण तुम्ही कधी साबुदाण्याचे पॉपकॉर्न खाल्ले आहेत का? अगदी साबुदाण्यापासून तयार होणारे हे पॉपकॉर्न अतिशय कुरकुरीत, हलके आणि चविष्ट लागतात. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवण्याची किंवा मिक्सरमध्ये वाटण्याची अजिबात गरज नाही.ही रेसिपी व्रतासाठीही उत्तम आहे.

एकदा साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार करून ते व्यवस्थित वाळवून ठेवले, तर बराच काळ साठवून ठेवता येतात. जेव्हा खाण्याची इच्छा होईल, तेव्हा गरम तेलात तळून काही मिनिटांत खमंग पॉपकॉर्न तयार करता येतात. चला तर मग, ही सोपी आणि हटके रेसिपी कशी बनवायची ते पाहूया.Cook with Disha 78 या युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. (फोटौ सौजन्य :- @Cook with Disha 78)

साहित्य

साहित्य
  • मध्यम आकाराचा साबुदाणा – ½ कप
  • पाणी – साधारण 1¼ कप
  • व्रताचे मीठ – चवीनुसार
  • चिली फ्लेक्स – ½ छोटा चमचाजिरे – ½ छोटा चमचा
  • तळण्यासाठी तेल

साबुदाणा तयार करण्याची पद्धत

साबुदाणा तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम अर्धा कप मध्यम आकाराचा साबुदाणा घ्या. तो एका भांड्यात काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. साबुदाण्यावरची धूळ किंवा बारीक कण निघून जाण्यासाठी हाताने हलकेच चोळून धुवा. धुतल्यानंतर साबुदाण्यात अजिबात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. साबुदाणा पूर्णपणे निथळलेला असावा. लक्षात ठेवा, या रेसिपीची खासियत म्हणजे साबुदाणा भिजवायचा नाही.
आता एक प्रेशर कुकर घ्या आणि त्यामध्ये धुतलेला साबुदाणा टाका. ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजला होता, त्याच वाटीने पाणी मोजणे उत्तम. अर्धा कप साबुदाण्यासाठी साधारण सव्वा कप पाणी घाला. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका. यानंतर चवीनुसार व्रताचे मीठ घाला. कुकरचे झाकण लावून गॅसवर ठेवा. सुरुवातीला साधारण एक मिनिट गॅस मोठा ठेवा. कुकरमध्ये हवा तयार होऊ लागली की गॅस कमी करा आणि शिट्टी लावा.
आता मंद आचेवर एक शिट्टी येईपर्यंत साबुदाणा शिजू द्या. दुसरी शिट्टी येण्याआधीच कुकर गॅसवरून खाली उतरवा. कुकरमधील प्रेशर नैसर्गिकरित्या निघू द्या आणि त्यानंतर झाकण उघडा. झाकण उघडल्यानंतर साबुदाणा पूर्णपणे चिकट किंवा जास्त शिजलेला नसावा. तो साधारण 50 ते 60 टक्के शिजलेला दिसेल. वरचा भाग मऊ झालेला असेल आणि साबुदाण्याचे दाणे आतून फुगलेले दिसतील.

साबुदाण्याला मसाला देण्याची पद्धत

साबुदाण्याला मसाला देण्याची पद्धत

शिजलेला साबुदाणा लगेच एका मोठ्या परातीत किंवा बाऊलमध्ये काढा. मोठ्या भांड्यात काढल्यामुळे तो लवकर थंड होतो. आता चमचा किंवा स्पॅचुलाच्या मदतीने साबुदाणा चांगला मॅश किंवा मिक्स करा. असे केल्याने साबुदाण्यामध्ये चांगली बाइंडिंग तयार होईल. थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडे घट्ट होत जाते. आता त्यामध्ये व्रतामध्ये वापरता येणारे मसाले घाला.

चवीनुसार साधारण अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालू शकता. तुम्हाला तिखट कमी किंवा जास्त आवडत असेल, तर प्रमाण त्यानुसार बदलू शकता. साबुदाणा चिकट असल्यामुळे मसाला व्यवस्थित मिसळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मोठ्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रण शक्य तितके एकजीव आणि मऊ करा.

साबुदाणा पॉपकॉर्न रेसिपी

पॉपकॉर्नचा आकार देणे

पॉपकॉर्नचा आकार देणे

आता एका वाटीत किंवा भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये बोटे चांगली बुडतील एवढे पाणी असावे.हात पाण्यात बुडवून ओले करा. त्यानंतर थोडे साबुदाण्याचे मिश्रण घ्या आणि हाताने छोटे-छोटे पॉपकॉर्न किंवा गोळ्यासारखे आकार तयार करा.इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.पॉपकॉर्न खूप मोठे करू नका. शक्य तितके छोटे आणि पातळ आकार तयार करा. कारण नंतर ते तळताना चांगले फुलतात आणि आतूनही कुरकुरीत होतात.हाताला पाणी लावल्यामुळे साबुदाण्याचे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि पॉपकॉर्न बनवणे खूप सोपे होते.अर्धा कप साबुदाण्यापासूनही बरेच पॉपकॉर्न तयार होतात. त्यामुळे कमी प्रमाणात साबुदाणा घेतला तरी भरपूर पॉपकॉर्न मिळतात.

पॉपकॉर्न वाळवण्याची पद्धत

पॉपकॉर्न वाळवण्याची पद्धत

सगळे पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर ते स्वच्छ ताटात, ट्रेमध्ये किंवा मोठ्या प्लेटमध्ये पसरून ठेवा. आता हे चांगले वाळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.उन्हामध्ये ठेवले तर साधारण एका दिवसात ते व्यवस्थित वाळू शकतात. जर पंख्याखाली किंवा घरात वाळवत असाल, तर त्यांना अधिक वेळ लागू शकतो.पॉपकॉर्न पूर्णपणे कडक आणि कोरडे झाले पाहिजेत. त्यामध्ये ओलावा अजिबात राहू नये. पूर्णपणे वाळल्यानंतर त्यांचा रंगही थोडा बदललेला दिसेल.एकदा ते पूर्णपणे वाळले की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. अशा प्रकारे तयार केलेले साबुदाण्याचे पॉपकॉर्न योग्य प्रकारे वाळवून आणि साठवून ठेवले, तर पुढे गरजेनुसार तळता येतात.

पॉपकॉर्न तळण्याची योग्य पद्धत

पॉपकॉर्न तळण्याची योग्य पद्धत

आता हे वाळलेले पॉपकॉर्न तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापले पाहिजे. तेल पुरेसे गरम झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा.आता थोडे-थोडे पॉपकॉर्न तेलामध्ये सोडा. कढईमध्ये एकाच वेळी खूप जास्त पॉपकॉर्न टाकू नका. तेलाच्या प्रमाणानुसार पॉपकॉर्न टाका.तळताना काही सेकंदांतच साबुदाण्याचे पॉपकॉर्न फुलू लागतील. त्यांचा आकार जवळपास दुप्पट होईल आणि ते हलके, फुललेले आणि कुरकुरीत दिसू लागतील.पॉपकॉर्न व्यवस्थित फुलल्यानंतर गॅसची आच कमी करा आणि आणखी साधारण 10 ते 15 सेकंद ते हलकेच उलट-सुलट करत तळा. यामुळे पॉपकॉर्न आतपर्यंत छान कुरकुरीत होतात.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा