Ujjwal Chopra Microdrama Tring Tring:मनोरंजनाच्या सर्व माध्यमांवर अभिनेता उज्ज्वल चोप्रा यानं प्रभावी काम केलं आहे. अलीकडे आलेल्या क्विक टीव्हीवरील’ट्रिंग ट्रिंग’ या मायक्रोड्रामामध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला. यानिमित्त त्याचं रंगभूमीविषयी असलेलं नातं, मायक्रोड्रामा या प्रकाराविषयीची निरीक्षणं आणि विविध माध्यमांवरील आव्हानं या मुद्द्यांवर तो व्यक्त झाला.

‘ट्रिंग ट्रिंग’ या मायक्रोड्रामाच्या अनुभवाविषयी सांगा.
भविष्यातील जीवन, टाइम ट्रॅव्हल मशीन अशा संकल्पना दाखवणारे चित्रपट पाहत आपण सगळे मोठे झालो आहोत. क्विक टीव्हीवरील’ट्रिंग ट्रिंग’ ही एक पूर्णपणे काल्पनिक कथा असून तिची संकल्पना वेगळी आहे. ‘ट्रिंग ट्रिंग’ या मायक्रोड्रामामध्ये कल्पनाशक्ती आणि भविष्याभिमुख विचार आहे.
मायक्रोड्रामा प्रेक्षकांवर अधिक प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतोय का ?
मायक्रोड्रामा हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम आहे. मी लहान असताना टीव्ही हळूहळू गावागावांत पोहोचला आणि ते सर्वसामान्यांचं माध्यम झालं, तरीही या माध्यमाचा पुरेसा वापर झाला नाही.
प्रेक्षकांच्या अपेक्षांनुसार दर्जेदार आशय देण्यात आणि त्यांना सोबत घेऊन जाण्यात आपण काही प्रमाणात कमी पडलो. आपण या मायक्रोड्रामा माध्यमाचा योग्य वापर केला नाही, तर त्या बाबतीतही असंच काहीसं होऊ शकतं, पण हे माध्यम मोठ्या प्रमाणावर आशयपूर्ण विषय तयार करून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचवू शकतो.
Bhootam Bhayyam: चित्रपटाचं पोस्टर व्हायरल, मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण
Ajinkya Raut Interview : मी गौतम बुद्धांच्या भूमिकेत, अभिनेता अजिंक्य राऊतला पडायचं स्वप्न
चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सीरिजसारख्या विविध माध्यमांमध्ये अभिनयाची शैली कशी बदलते ?
प्रत्येक माध्यमात पात्र उभं करण्याची पद्धत वेगळी असते. सिनेमामध्ये अभिनय करताना कॅमेरा तुमच्या चेहऱ्यावर २०-३० सेकंद स्थिर राहतो, त्यामुळे तुमच्या भावना, हावभाव प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचतात. मात्र मायक्रोड्रामामध्ये तशी मोकळीक नसते, त्याचं स्वरूप वेगळं आहे. तिथे सगळं फार वेगानं होतं. अशा वेळी मला रंगभूमीच्या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला. मायक्रोड्रामाचे भाग साधारण दोन ते अडीच मिनिटांचे असतात. त्यामुळे कथेमधील थरार आणि उत्कंठा कायम राखणं गरजेचं असतं.
विशिष्ट कालखंडातील भूमिका साकारताना प्रत्येकाचं वेगळेपण कसं जपलं ?
‘पद्मावत’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटात काम करताना त्या काळात स्वतःला घेऊन जावं लागतं. त्या वेळच्या लोकांचा पेहराव, वागणं, जीवनशैली हे समजून घ्यावं लागतं. त्या काळाचा सखोल अभ्यास करावा लागतो. अभिनय ही रंजक प्रक्रिया आहे. एकदा तुम्ही त्या प्रक्रियेत रमलात की, बाकी सर्व गोष्टींचा विसर पडतो.
रंगभूमी आणि जाहिरात क्षेत्रात कलाकाराला स्वतःचे विचार मांडण्याचं आणि नव्या कल्पना सुचवण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळतं. सिनेमामध्ये हे बरंचसं दिग्दर्शकावर अवलंबून असतं; कारण प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत आणि दृष्टिकोन वेगळा असतो.

