India’s First Travelator Skywalk: एमएमआरडीए महालक्ष्मी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करण्याच्या जवळ असल्याने महालक्ष्मी रेल्वे स्थानक, मेट्रो लाइन 3 स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक दरम्यान विनाअडथळा प्रवास करण्यासाठी सरकते पट्टे असलेला स्कायवॉक बांधला आहे.

कसा असेल पादचारी पूल?
या प्रकल्पांतर्गत सुमारे २८३ मीटर लांब आणि ११ मीटर रुंद असा एकात्मिक पादचारी पूल उभारला जात आहे. पुलावर एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ‘ट्रॅव्हलेटर्स’ बसवले जाणार आहेत. दिव्यांग प्रवाशांसह सर्वांसाठी दोन लिफ्टची सुविधाही उपलब्ध असेल. या पुलावरून दर तासाला साडेचार हजार प्रवासी ये-जा करू शकतील.
प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मोनोरेल, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये अखंड जोडणी निर्माण झाल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
दाट नागरी वस्तीमध्ये हा प्रकल्प उभारताना मोठ्या व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली. तसेच जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणताही अडथळा न आणता काम पूर्ण करण्यात आले. बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आले नसून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने साने गुरुजी मार्गावरील वाहतूक आणि गणेश विसर्जन मिरवणुकांवरही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
खासगी वाहनांवरील अवलंबित्व घटणार
एमएमआरडीएच्या मते, हा प्रकल्प केवळ पादचारी पूल नाही. तो मुंबईतील मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वेला एका प्रवासी-केंद्री सार्वजनिक वाहतूक साखळीत जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. यापूर्वी केवळ विमानतळावर असा स्कायवॉक उपलब्ध होता. त्यानंतर मुंबईत असा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात महालक्ष्मी रेल्वे स्थानकालाही या स्कायवॉकशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेल अशा तिन्ही ठिकाणांसाठी इंटरचेंज निर्माण होणार आहे.
दक्षिण मुंबईला चेंबूरशी जोडणाऱ्या २० किमी लांब मोनोरेल मार्गावरील अंतिम टर्मिनल संत गाडगे महाराज चौक स्थानक आहे. त्यामुळे हे स्थानक अत्यंत महत्त्वाचं असून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. तथपि, अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोरेल सेवा सप्टेंबर २०२५पासून बंद आहे. सर्व दुरुस्ती आणि अपग्रेडची कामे पूर्ण झाली असून लवकरच पुन्हा शहरात मोनोरेल धावणार आहे. एमएमआरडीए सध्या मेट्रो स्थानकांना इंटरचेंजद्वारे वेगवेगळ्या मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी जोडत आहे. तसेच, मेट्रो लाइन २बीवरील चेंबूर मेट्रो स्थानकाला मोनोरेल स्थानकाशी जोडण्यात येणार आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सध्या सरकते जिने आहेत पण सतत तांत्रिक बिघाडामुळे ते बंद असल्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करतात. हे सरकते पट्टे प्रवाशांसाठी खरचं फायदेशीर ठरतील का? इतर कोणत्या ठिकाणी अशी सुविधा सुरु करू शकतो ? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.

