Headlines

Thane Police: घरांसाठी पोलिस प्रतीक्षेत; ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत 8500 घरांची गरज, 544 घरांची अवस्था अत्यंत खराब – thane police commissionerate jurisdiction need for 8500 homes


Thane Police News: पोलिसांच्या घरांचा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येत असला, तरी नव्या आणि सुसज्ज पोलिस वसाहती उभारण्याबाबत अपेक्षित वेगाने प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

thane police
ठाणे पोलिस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश गायकवाड, ठाणे : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी २४ तास ‘ऑन ड्युटी’ राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसमोर घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या घरांची संख्या अपुरी असतानाच, सध्या असलेल्या पोलिस वसाहतींमधील अनेक घरे खराब अवस्थेत आहेत.

आयुक्तालयातील पोलिस वसाहतींमधील एकूण घरांपैकी ५४४ घरे राहण्यायोग्य नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, ठाणे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता आणखी सुमारे ८ हजार ५०० घरांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड-एकनाथ शिंदे एकाच मंचावर; भर कार्यक्रमात जुगलबंदी रंगली

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४१ पोलिस वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकूण १ हजार ४८४ घरे आहेत. या घरांमध्ये सध्या अनेक पोलिस कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, बहुतांश वसाहतींमधील इमारती जुन्या झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही इमारतींच्या दुरुस्तीची कामे सुरू असून काही ठिकाणी दुरुस्ती पूर्ण झाल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. तरीही अनेक पोलिस कुटुंबीयांना जुन्या, कोंदट आणि अपुऱ्या सुविधांच्या घरांमध्ये राहावे लागत आहे.

वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असल्याची तक्रार पोलिस कर्मचाऱ्यांकडून केली जाते. निवृत्तीचे वय जवळ आले, तरी सेवाकाळात हवेशीर आणि सुसज्ज घरात राहण्याचे भाग्य लाभत नसल्याची खंत अनेक पोलिस कर्मचारी व्यक्त करतात.
Maharashtra TimesNashik Accident : अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट
ठाणे आयुक्तालयातील एकूण घरांपैकी ९४० घरे राहण्यास योग्य आहेत. उर्वरित ५४४ घरांची अवस्था खराब असून, त्यांची दुरुस्ती सुरू असल्याची माहिती आयुक्तालयातील संबंधित विभागाकडून देण्यात आली. दुसरीकडे, अनेक पोलिस कर्मचारी घरांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८५० आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९ हजार १७९ इतकी आहे. या संख्येचा विचार करता सुमारे ८ हजार ५०० घरांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नव्या गृहप्रकल्पांना गती देऊन जास्तीत जास्त सुसज्ज घरे पोलिसांना वेळेत उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन घरे निर्मितीचे नियोजन
पोलिस आयुक्तालयातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी घरांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ येथे २३६ घरांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोळशेवाडी येथे १४० घरे, डोंबिवलीमध्ये १६५ घरे, तर विठ्ठलवाडी येथे ५३४ घरांच्या प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळाल्यास प्रतीक्षा यादीतील पोलिस कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Maharashtra TimesUddhav Thackeray : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तरीही उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री शाहांना सुनावलं; उद्याच्या मुंबईतील मोर्चाबाबतही भूमिका स्पष्ट
वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १८ घरे
ठाणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी १८ निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव आहे. ही निवासस्थाने माजिवडा परिसरात उभारली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने सर्व स्तरांवरील गृहप्रकल्पांना तातडीने गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.

चाळीच्या ठिकाणी उभे राहणार दोन टॉवर
ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयालगत असलेल्या जरीमरी पोलिस वसाहतीच्या परिसरात जुनी बैठी चाळ आहे. या चाळीला ११२ वर्षे झाली असून, आजही या चाळीत पोलिस कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या जुन्या चाळीच्या ठिकाणी दोन नवीन टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. या टॉवरमध्ये एकूण ३१६ घरे असतील. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असा दावा करण्यात आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा