![]()
शहरातील गाडगेनगरमध्ये राहणाऱ्या होमगार्ड जवानाच्या बुलेटचा समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. या अपघातात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसह २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या आई-वडिलांसह आणखी एक तरुण जखमी झाला. हा हृदयद्रावक अपघात रविवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास कुऱ्हा मार्गावरील वीरगव्हाण ते मार्डीदरम्यान घडला. या अपघातात अभिज्ञा धीरज तायडे (अडीच वर्षे, रा. गाडगेनगर, अमरावती) आणि वंश सतीश मुळे (२३, रा. राजापूर, ता. आर्वी, जि. वर्धा) यांचा मृत्यू झाला. तर पूनम धीरज तायडे (वय ३०), धीरज ज्ञानेश्वर तायडे (वय ४०, दोघेही रा. गाडगेनगर) आणि अथर्व पंडित मेश्राम (१७, रा. वीरगव्हाण) हे जखमी झाले आहेत. गाडगेनगर येथे राहणारे होमगार्ड जवान धीरज तायडे हे पत्नी पूनम आणि चिमुकली अभिज्ञासह बुलेटवरून जहागीरपूर येथे निघाले होते. ते कुऱ्हा मार्गे जात असताना मार्डीपासून काही अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वंश मुळे याच्या दुचाकीशी त्यांच्या बुलेटची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बुलेटचे पुढील चाक अक्षरशः तुटले. या धडकेत चिमुकली अभिज्ञाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पूनम आणि धीरज यांनाही गंभीर मार लागला. दुसऱ्या दुचाकीवरील वंश मुळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अथर्वने मागितली होती ‘लिफ्ट’ वंश मुळे हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी होता. तो अमरावतीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात शिकवणीसाठी येत होता. अथर्व मेश्रामने वंशकडे लिफ्ट मागितली. मात्र, वीरगव्हाणपासून काही अंतरावरच अपघात झाला. अपघातात वंशचा मृत्यू झाला, तर अथर्व जखमी झाला.
Source link
दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकलीसह तरुणाचा मृत्यू:3 जखमी : कुऱ्हा मार्गावर वीरगव्हाण-मार्डीदरम्यान अपघात
