![]()
पुण्यात ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी एका ७० वर्षीय वकील महिलेची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर राहणाऱ्या या वकील महिलेला ५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला एका राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी असल्याचे भासवले. महिलेचे बँक खाते काळ्या पैशांच्या व्यवहारात वापरले जात असून, या प्रकरणात त्यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. यानंतर घाबरलेल्या महिलेने तीन दिवसांच्या कालावधीत वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ७० लाख रुपये जमा केले. नंतर चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सायबर चोरट्यांनी आणखी एका डॉक्टरची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. येरवड्यातील महावीर सोसायटीत राहणाऱ्या ४६ वर्षीय डॉक्टरांनी या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉक्टरांचे एका खासगी बँकेत खाते असून, ते ऑनलाइन खरेदी व्यवहारांसाठी एका ॲपशी जोडलेले होते. चोरट्यांनी डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेऊन त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख २३ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवले. पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
डिजिटल अरेस्टच्या धमक्या देऊन वकील महिलेची 70 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
