![]()
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांच्या वर्तनातील एक अनोखी आणि अभ्यासपूर्ण घटना निदर्शनास आली. अभयारण्यातील बाभळीच्या झाडावर लटकलेल्या सुगरणीच्या घरट्यात खवलेकरी मुनिया या पक्ष्याची पिले पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांना आढळून आली. एकाच झाडावर सुगरणीची अनेक घरटी असताना, त्यापैकी एका तयार घरट्याचा मुनियाने प्रजननासाठी केलेला वापर लक्षवेधी ठरला आहे. सुगरण आपल्या कौशल्यपूर्ण विणलेल्या घरट्यासाठी प्रसिद्ध आहे. गवताच्या लांब तंतूंचा वापर करून नर सुगरण अतिशय सुबक व मजबूत लोंबकळणारे घरटे तयार करतो. या घरट्याची रचना पाऊस, वारा तसेच काही भक्षकांपासून संरक्षण मिळण्यास अनुकूल असते. दुसरीकडे, मुनिया साधारणपणे गवत, पाने व इतर वनस्पतींच्या साहित्याचा वापर करून घुमटाकार घरटे तयार करतो. मात्र, सुरक्षित व तयार घरटे उपलब्ध असल्यास त्याचा पुनर्वापर करण्याची संधी पक्षी स्वीकारू शकतात. पक्ष्यांसाठी घरटे बांधण्याची योग्य जागा, गवत, झुडपे, काटेरी झाडे व सुरक्षित अधिवास ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. या संसाधनांची उपलब्धता कमी झाल्यास विविध पक्षीप्रजातींमध्ये त्यासाठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे सुगरणीच्या तयार घरट्याचा मुनियाने केलेला वापर हा आंतरप्रजाती संसाधन-वापराच्या दृष्टीने अभ्यासण्यासारखा विषय आहे. मात्र, या एका निरीक्षणावरून मुनियाने सुगरणीचे घरटे बळकावले किंवा दोन्ही पक्ष्यांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.या घटनेमुळे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील अधिवासाची जैवविविधतेसाठी असलेली भूमिका पुन्हा अधोरेखित होते. सुरक्षित अधिवास, झाडे, गवताळ भाग व झुडपी वनस्पती उपलब्ध असल्यामुळे विविध पक्ष्यांना येथे प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती मिळत आहे. घरट्यांना त्रास न देणे महत्त्वाचे आहे. ^माळरानातील बदल, शहरीकरणामुळे अनेक छोट्या पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी योग्य जागा व साहित्य मिळणे आव्हानात्मक होत आहे. विशेषतः गवत कापले जाणे किंवा अधिवासात वारंवार मानवी हस्तक्षेप होणे यामुळे जमिनीवर किंवा झुडपांमध्ये घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधीच तयार असलेल्या सुरक्षित घरट्याचा वापर करणे हा वेळ व ऊर्जा वाचविणारा पर्याय ठरू शकतो. – प्रा. आनंद बोरा , पक्षी अभ्यासक
Source link
जैवविविधता:नांदूरमध्यमेश्वरला सुगरणीच्या घरट्यात मुनियाची पिले
