Headlines

चाकण औद्योगिक पट्ट्यात 31 ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश, अन्यथा थेट गुन्हे दाखल होणार


चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था याची गंभीर दखल आता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयात या विषयावर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 31 ऑगस्टपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत रस्ता दुरुस्त केला नाही तर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Pune News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांना स्पष्ट कालमर्यादा आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.

या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश

चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

रस्त्यावरील पार्किंगला ‘झिरो टॉलरन्स’

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून रस्त्यावर वाहन पार्क करण्यास पूर्णपणे बंदी राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक व्यवस्थेसाठी १०० MSF जवान

चाकण औद्योगिक परिसराचा मोठा विस्तार लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनासाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करतील. याशिवाय रस्त्यावर वाहने बंद पडल्याने वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था केली जाणार आहे.

महिनाभरात अतिक्रमणांवर कारवाई

चाकण परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल, गोदामे आणि इतर अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांना नोटीस देऊन २५ ऑगस्टपासून पुढील एक महिन्यात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे.

अतिक्रमण हटविल्यानंतर त्या जागेवर रस्ता किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय किंवा अन्य कोणत्याही दबावामुळे अतिक्रमणांवर कारवाई टाळली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

AI आणि CCTVच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन

चाकण परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येणार आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे नियोजन आहे.

संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून करण्याची योजना आहे.

पादचारी सुरक्षेला प्राधान्य

रस्त्यांच्या विकासासोबत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंगची सुविधा विकसित केली जाणार आहे. चाकण परिसरात यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून केवळ नियोजित ठिकाणीच यू-टर्न आणि प्रवेशाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

वीजपुरवठ्याच्या समस्येवरही उपाय

औद्योगिक परिसरातील वारंवार होणारे वीज ट्रिपिंग आणि लोडशेडिंगच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून, संबंधित कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे ३१ डिसेंबरनंतर ट्रिपिंग आणि लोडशेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विकासकामांपूर्वी वाहतूक आराखडा बंधनकारक

राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे आदी विभागांची आगामी कामे सुरू होणार आहेत. मात्र, या कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास केल्यानंतरच कामांना परवानगी देण्यात येणार आहे.

नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

‘पुढील काही दिवसांत परिणाम दिसतील’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांवर अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांनी मागणी केल्यानंतर आवश्यक पोलीस मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.

दरम्यान, ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसांत उपाययोजनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांना कितपत आळा बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा