Headlines

एक्सपायर्ड तूप, शौचालय गोदामासमोर अन् सिगारेट विक्री; ब्लिंकिटच्या 2 हबवर एफडीएची धडक कारवाई


अन्न आणि औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्लिंकिट या नामांकीत कंपनीला मोठा दणका दिला आहे. एफडीएने ब्लिंकिटच्या 2 मुख्य केंद्रांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar FDA Action
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन अन्न साठवणूक आणि जलद वितरणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेसर्स ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (ब्लिंकिट) या नामांकित कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. शहरातील सातारा परिसर हायकोर्ट कॉलनीबी आणि हरसूल परिसर येथील ब्लिंकिटच्या २ मुख्य केंद्रांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कायदेशीर नियमांचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे आणि फरिद सिद्दीकी यांच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी तपासणी केली. यावेळी थेट सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्याने सहायक आयुक्त (अन्न) तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले.

ब्लिंकिटच्या गोदामांमध्ये आढळलेल्या मुख्य ६ गंभीर त्रुटी:

१) अन्नपदार्थांसोबत सिगारेट विक्री: खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन वितरण केंद्रावरूनच विल्स,क्लासिक,मार्लबोरो यांसारख्या तंबाखूजन्य सिगारेटची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले.

२) मुदत संपलेले (कालबाह्य) अन्न साठवणे: वापरण्याची मुदत संपलेल्या गाईच्या तुपाच्या प्लास्टिक बरण्या नियमित विक्रीच्या साठ्यामध्ये आढळल्या.

३) अस्वच्छता आणि शौचालयाची चुकीची जागा: हरसूल येथील गोदामात कांदा, बटाटा आणि पिठाचे कप्पे थेट शौचालयाच्या अगदी समोर ठेवलेले आढळले. हात धुण्याच्या ठिकाणी तंबाखूचे डाग आणि अस्वच्छता आढळल्याने सूक्ष्मजैविक दूषितीकरणाचा तीव्र धोका दिसून आला.

४) शीतसाखळीचे उल्लंघन: शीतगृहात ठेवणे अनिवार्य असलेले खाद्यपदार्थ सामान्य तापमानावर उघड्या कप्प्यांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तसेच शीतगृहांचे तापमान नोंदवणारे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नव्हते.

५) शाकाहारी-मांसाहारी एकत्र अन् कर्मचाऱ्यांची अस्वच्छता: शीतगृहात शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकाच कप्प्यात ठेवले होते. तसेच अन्न हाताळणारे कर्मचारी विशेष गणवेश, हातमोजे आणि डोक्यावरील टोपी न वापरता काम करत होते व त्यांच्याकडे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे नव्हती.

६) पुरवठा साखळी व बिलांचा अभाव: इतर आस्थापनांच्या नावाने खरेदी बिले आढळली, मात्र ब्लिंकिटशी त्यांचा असलेला अधिकृत संबंध व खरेदी-विक्रीची माहिती दर्शवणारी कागदपत्रे दाखवता आली नाहीत.

परवाना निलंबित; ऑनलाईन डिलिव्हरी सुरू ठेवल्यास गुन्हेगारी कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार, निलंबनाच्या कालावधीत ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला किंवा त्यांच्या वतीने कोणालाही सातारा व हरसूल येथील केंद्रांतून कोणत्याही अन्नपदार्थांची खरेदी, साठवणूक किंवा भ्रमणध्वनी उपयोजनाद्वारे ऑनलाईन वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निलंबनानंतरही अनधिकृतपणे व्यवसाय किंवा वितरण सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर आणि गुन्हेगारी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा