Headlines

चर्चेचे घोडे अडलेलेच!


‘सीजेपी’ला चारवेळा आमंत्रित केल्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा दावा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

नीट पेपरफुटीचा मुद्दा रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत तापला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणारे ‘सीजेपी’ कार्यकर्ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सरकारची बाजू स्पष्ट केली. ‘सीजेपी’ समर्थक किंवा विद्यार्थ्यांशी सरकारची चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. जिथे चर्चा हवी असेल तिथे चर्चा करण्यास सरकार तयार आहे. आतापर्यंत चारवेळा सरकारने ‘सीजेपी’समोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला, असे जितेंद्र सिंग म्हणाले. तसेच केवळ संवादानेच हा प्रश्न सुटेल, असा आशावाद व्यक्त करताना वेगवेगळ्या अटी लादून चर्चेसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पुन्हा एकदा विद्यार्थी आणि तरुणांशी चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले की, केंद्र सरकार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी चर्चा करण्यास तयार आहे. तुम्हाला हवा तितका वेळ देण्यास आम्ही तयार आहोत. चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि मी दोघेही उपस्थित राहणार असल्याचेही सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार : जितेंद्र सिंह

‘सरकारच्या वतीने, मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आवाहन करायचे आहे. सरकारच्यावतीने आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. सरकारचे दरवाजे सदैव खुले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही वेळी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आंदोलनांव्यतिरिक्त इतर विषयांवरही सरकार चर्चेसाठी तयार असेल. चर्चेसाठी विद्यार्थी जितका वेळ मागतील, तितका वेळ देण्यास आम्ही तयार आहोत. केवळ तोडग्यातूनच एक नवीन मार्ग निश्चित केला जाऊ शकतो’, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

चला, बसून चर्चा करूया : जितेंद्र सिंह

पंतप्रधान मोदी स्वत: या विषयाबाबत संवेदनशील आहेत. ते तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतात. यापासून प्रेरणा घेऊन जलद निर्णय सुनिश्चित करण्यासाठी पेपरफुटीत दोषी आढळलेल्यांना जलदगती न्यायालय कार्यवाहीद्वारे शिक्षा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नम्रपणे आवाहन करतो की, एकत्र या, चर्चा करा आणि या समस्येवर प्रामाणिकपणे तोडगा काढा.

– जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत