नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. महायुतीकडून करण्यात आलेल्या प्रचंड प्रयत्नांनंतर अखेर माघार घेतल्याचं चित्र असतानाच अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपली जादू दाखवून दिली. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा त्यांनी धुव्वा उडवला. गीतेंच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. मात्र यावेळी गीते आणि दराडे समर्थक आमनेसामने आले होते. ज्यामुळे गोंधळ उडालेलाही पाहायला मिळाला. नरेंद्र दराडे हे गीते समर्थकांवर चिडल्याचं चित्रही पाहायला मिळालं. महायुतीत असून महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घात केला, असं म्हणत नरेंद्र दराडे यांनी नाराजी व्यक्त केलीय. यावेळी दराडेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही थेट आरोप केलेत.