म.टा. प्रतिनिधी, मुंबई: जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात २५ टक्के तूट आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस नसल्याने, मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये अधिक ताण निर्माण होऊ शकेल, याकडे हवामानतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.
राज्यामध्ये १ जूनपासून २४ जुलैपर्यंत सरासरी ४४४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी कमी आहे. कोकण विभागामध्ये आत्तापर्यंत सिंधुदुर्गात सर्वाधिक, ३७ टक्के तूट आहे. मात्र, तिथे १ हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी आणि ठाणे ‘सरासरी’ श्रेणीत आहेत. पालघर येथे ‘तीव्र अतिरिक्त’, तर मुंबई शहर, उपनगर, रायगड येथे ‘अतिरिक्त’ पाऊस नोंदला गेला आहे.
या अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पावसाने राज्याचे एकूण पर्जन्यमान सुधारले आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथे तीव्र अतिरिक्त आणि सातारा येथे अतिरिक्त पाऊस झाला आहे. अहिल्यानगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे सरासरीच्या श्रेणीमध्ये आहेत. राज्यात सर्वाधिक तूट नंदुरबारमध्ये आहे. मध्य महाराष्ट्राचे पाऊसमान अतिरिक्त नोंदले गेले आहे.
मात्र, विदर्भ, मराठवाड्यात स्थिती कठीण आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव सध्या ‘सरासरी’च्या श्रेणीत आहेत. येत्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या ‘सरासरी’च्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये तूट निर्माण होऊ शकेल. या दृष्टीने नियोजन गरजेचे असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
किनारपट्टीच्या प्रणालींचा फायदा
विदर्भामध्ये भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस सध्या सरासरीच्या श्रेणीत आहे. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळमध्ये पावसाची तूट आहे. काही वेळा पूर्व किनारपट्टीवरील प्रणालींचा विदर्भाला फायदा झाल्याने मराठवाड्याच्या तुलनेत दिलासा मिळू शकतो, असेही होसाळीकर यांनी सांगितले.
‘पावसाचा पट्टा दुर्मीळ नाही’
शुक्रवारी दिवसभरात सोशल मीडियावर, उत्तर भारतापासून हिमालयावरून चीनमार्गे दक्षिण कोरियापर्यंत पसरलेला १० हजार किलोमीटर लांबीचा पावसाचा एक अवाढव्य पट्टा दिसत असल्याची चर्चा होती. हा पट्टा उपग्रह प्रतिमांमध्ये टिपला गेला असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, असे सांगितले जात होते. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी अनुपम काश्यपी यांनी सांगितले. पावसाळ्याच्या काळात पूर्व आशियाई प्रदेशापासून दक्षिण चीन ते कोरियाच्या पट्ट्यापर्यंत ढगांचा पट्टा दिसू शकतो. मात्र हे दुर्मीळ नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पूर येईल अशा चर्चा खोट्या असल्याचे पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागातील हवामानशास्त्रज्ञ सखा सानप यांनी सांगितले.
आषाडी एकादशीला महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतोच. पण सध्या मुंबईतील पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. २५ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रागयगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात-नाशिकमध्ये परिस्थिती काय?
पुण्याच्या घाटमाथा परिसरात आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपलं आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे घाट परिसरात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा