Nashik News: खरेदीतील कथित अनियमितता कांद्याची साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केली.

पंचनाम्यात नमूद
चांदवड तालुक्यात नाफेडच्या खरीप कांदा खरेदी २०२६-२७ अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या साठवणुकीबाबत गंभीर बाबी समोर आल्याचे दोन्ही खासदारांनी सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. ३ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या पंचनाम्यानुसार साठवण केंद्रावरील सुमारे ६० ते ७० टक्के कांदा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. अंदाजे २,२०० ते २,४०० मेट्रिक टन कांदा शेडमध्ये साठवण्यात आल्याची नोंद आहे. पाहणीच्या वेळी संबंधित खरेदीकेंद्रावर कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचेही पंचनाम्यात नमूद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी’
‘पीएसएफ’अंतर्गत नाशिक जिल्ह्यात झालेल्या कांदा खरेदीमध्ये सहभागी ‘एफपीओ’ व ‘एफपीसी’ आणि सहकारी संस्थांची माहिती, खरेदी केंद्रांची संख्या व ठिकाणे ‘सीडब्लूसी’ गोदामांमध्ये साठवलेल्या कांद्याचे प्रमाण, नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून करण्यात आलेल्या तपासण्या तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील केंद्र सरकारकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदार वाजे आणि खासदार भगरे यांनी संयुक्तपणे केली.
कारवाईची मागणी
कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावातील अस्थिरता आणि उत्पादन खर्चाच्या संकटाचा सामना करत असताना शासनाच्या योजनेअंतर्गत त्यांच्या कांद्याची खरेदी झाल्यानंतर तो योग्य पद्धतीने साठवला जात नसेल, तर शेतकऱ्यांच्या हिताला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोषी व्यक्ती अथवा संस्थांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी भूमिका दोन्ही खासदारांनी मांडली.

