Headlines

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई:'सेफ फूड, सेफ ड्रग' मोहिमेअंतर्गत 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त




अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने प्रशासनाने १२,२७८ लिटर दूध नष्ट केले. या आस्थापनेचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला आहे. तसेच, आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळले. येथून १,१५५ किलो एडिबल केसिनेट आणि कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातही एफडीएने कारवाई केली. रामदेव डेरी येथे विनापरवाना आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाईचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने तेथील १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट केला. याच मोहिमेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करण्यात आले आणि त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. पुण्याच्या ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनेत गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ग्राहकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादनाचे लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि एफएसएसएआय परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत