Headlines

Siya Goyal: केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट; सियाच्या वकिलांनी भावालाच धाडली 10 कोटींची नोटिस; वाद नेमका काय?


Siya Goyal: बांधकाम व्यायसायिक केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी त्याच्या होणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. आरोपी सियाच्या वकिलांनी सियाच्या भावालाच १० कोटींची नोटिस बजावली आहे.

siya brother
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयानं ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकीकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना वडगाव मावळ न्यायालयात वेगळीच चर्चा सुरू झाली. सियाचे वकील नेमके कोण, हा प्रश्न अनेकांना पडला. गेल्या काही दिवसांपासून सियाचे वकील म्हणून आशुतोष श्रीवास्तव यांचं नाव चर्चेत आहे. पण सुनावणीवेळी सिया गोयलनं ‘माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत,’ असं म्हटलं.

सियाचा भाऊ साहिलनं एक दिवस आधी माध्यमांशी संवाद साधताना वकिलासोबत काही मतभेद असल्याचं सांगितलं. ‘आशुतोष श्रीवास्तव माझे वकील नाहीत. मी त्यांची सेवा घेतलेली नाही. त्यांनी कधीही माझ्याशी याबद्दल चर्चा केलेली नाही. मी जेव्हा त्यांना याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही दुसऱ्या वकिलाची सेवा घेतली आहे. त्यांनी पोलीस कोठडीत सियाची स्वाक्षरी घेतली. विपुल दुशिंग आमचे वकील आहेत. या संदर्भात आम्ही न्यायालयात शपथपत्रही दाखल केलं आहे,’ असं साहिलनं सांगितलं.
Maharashtra TimesPune Crime: …तर सियादेखील केतनसोबत दरीत पडली असती! गडबड होण्याचा धोका; मग ‘बसण्याचा’ प्लान ठरला
यानंतर वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयल यांना १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटिस पाठवली आहे. ‘साहिल गोयल यांनी माझ्यावर खोटे, तथ्यहीन आरोप केले. माझी बदनामी केली. त्यामुळे माझ्या व्यावसायिक प्रतिष्ठेचं नुकसान झालं आहे,’ असं वकील श्रीवास्तव यांनी नोटिशीत म्हटलं आहे. आरोप तात्काळ मागे घ्या. जाहीर माफी मागा आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोप पुन्हा करू नका, अशी हमी लेखी स्वरुपात द्या, अशी मागणीदेखील वकिलांकडून नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Maharashtra TimesPune Crime: केतनला का संपवलं? डोक्यात 3 वर्षांचं गणित पक्कं; सियानं पोलीस चौकशीत रहस्य उलगडलं
सियाचा भाऊ साहिलनं अद्याप तरी श्रीवास्तव यांच्या नोटिशीवर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. श्रीवास्तव यांच्या कायदेशीर नोटिशीवर साहिल गोयल काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

वकील आशुतोष श्रीवास्तव काय म्हणाले?
आमची टीम सिया गोयलकडे गेली होती. त्यांना आमच्या कायदेशीर मदतीची गरज होती. त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. सिया गोयल सज्ञान आहे. ती स्वत:चे निर्णय घेऊ शकते, असं श्रीवास्तव यांनी म्हटलं. ‘साहिल गोयल यांचं वक्तव्य चुकीचं आहे. कारण आम्ही त्यांच्याशी नव्हे, तर सिया गोयल यांच्याशी थेट बोललो होतो,’ असं श्रीवास्तव म्हणाले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा