प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला घात : अथणी तालुक्यातील प्रकाराने खळबळ : दोघांना अटक, खुनानंतर भासवला अपघात
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून काटा काढला व खुनानंतर अपघात भासवून खून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अथणी तालुक्यातील शिरूरजवळ घडलेल्या या खळबळजनक खून प्रकरणाचा अथणी पोलिसांनी छडा लावला असून पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. महांतेश बसाप्पा धनाळे (वय 32), रेणुका चंद्रकांत शिवपुजी (वय 31, दोघेही रा. खिळेगाव, ता. अथणी) अशी त्यांची नावे आहेत. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक मल्लिकार्जुन तळवार, ए. ए. इरकर, बी. आर. पाटील, एम. एस. कोंडी, जे. आय. पटेगार, जी. पी. राठोड, श्रीमती एस. बी. खोत, बी. एम. तळवार, पी. आर. अरळीमट्टी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
खिळेगाव येथील चंद्रकांत संगाप्पा शिवपुजी (वय 41) या युवकाचा खून करून अपघात भासविण्यात आला होता. 8 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार ते साडेपाच यावेळेत शिरूरजवळील गोऱ्याळ ओढ्यानजीक ही घटना घडली होती. खून झालेल्या चंद्रकांतचा भाऊ सुरेश शिवपुजी यांनी अथणी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी चंद्रकांतची पत्नी रेणुका व तिचा प्रियकर महांतेश यांना अटक केली.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महांतेशची ऊस तोडणी टोळी होती. या टोळीत खून झालेला चंद्रकांत शिवपुजी काम करीत होता. मजुरीची रक्कम देण्यासाठी महांतेश नेहमी चंद्रकांतच्या घरी जात होता. याचवेळी चंद्रकांतची पत्नी रेणुकाशी त्याची मैत्री जमली. महांतेशने तिचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी बोलणे सुरू ठेवले. काही दिवसांनी अनैतिक संबंधात त्याचे रुपांतर झाले. गावात याची चर्चा सुरू होताच पंचांसमोर आणून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. पंचांनी दोघा जणांना समजावून सांगूनही ते ऐकले नाहीत. शेवटी चंद्रकांतने आपल्या पत्नीच्या माहेरी ही गोष्ट कळविली. माहेरवासीयांनी महांतेशला दम भरला. त्यानंतर गावभर याची चर्चा वाढली. चंद्रकांतमुळे गावात आपली बदनामी झाली. आता त्याचाच काटा काढूया असे महांतेश व रेणुका यांनी ठरविले. या दरम्यान रेणुकाला काविळ झाली होती. काविळीवर औषध घेण्यासाठी चंद्रकांत आपल्या पत्नीला रोज खिळेगावहून ऐनापूरला घेऊन जात होता. चंद्रकांतचा काटा काढण्यासाठी हीच संधी साधण्यात आली.
रोज पहाटे केए 23 ईडब्ल्यू 6756 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून चंद्रकांत व रेणुका ऐनापूरला जात होते. शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी पहाटे घरातून बाहेर पडताना रेणुकाने आपल्या प्रियकराला मेसेज करून आम्ही सुटलोय, असे कळविले. शिरूरजवळील वळणावर दबा धरून बसलेल्या महांतेशने गोऱ्याळ ओढ्यानजीक चंद्रकांतवर रॉडने हल्ला करून त्याचा खून केला. त्याच रॉडने मोटारसायकलचीही तोडफोड करून रस्त्यावर फेकून दिली व अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासवले. याप्रकरणी खून झालेल्या युवकाची पत्नी व तिच्या प्रियकराला अथणी पोलिसांनी अटक केली आहे.
खुनासाठी रॉडचा उपयोग
चंद्रकांतच्या खुनासाठी महांतेशने अथणी येथील एका स्क्रॅप अ•dयावरून लोखंडी रॉड खरेदी केला होता. खुनानंतर बसवेश्वर पाणी योजनेच्या कॅनॉलमध्ये तो रॉड फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी खुनासाठी वापरलेली मोटारसायकल, मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
