![]()
देशाची आर्थिक राजधानी असणारं हे मुंबई शहर. स्वप्नाचं. स्वप्नपूर्तीचं शहर. सोशिकपणा, सर्वसमावेशकता हा या शहराचा स्थायीभाव मानला जायचा. मात्र मागील काही महिन्यांपासून या सोशिकता संपू लागल्याच्या अनेक घटना आजूबाजूला दिसतायत. पळणाऱ्यांच्या पायाला भिंगरी असली तरीही पूर्वीसारखा आता संयमाचा बांध राहिलेला नाही. लोकलमध्ये झालेली तरुण मुलाची हत्या, प्लॅटफॉर्वर प्राध्यापकावर झालेला हल्ला आणि मृत्यू, रस्तेप्रवासात वाढलेले अन् विकोपाला जाणारे वाद, शिवीगाळ. छोट्यामोठ्या कारणांवरून होणाऱ्या वादाचं रूपांतर हिंसेमध्ये होण्याचे प्रकार का वाढीस लागले आहेत.
शहर प्रत्येकाला संधी देत असं म्हणतात. काहींचं आयुष्य बदलतंही.. तरीही महानगरांमधली अस्वस्थता वाढत चालली आहे. याचा अधिक खोलात जाऊन विचार केला तर शहरांत सगळ्यांचीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत. उलट मागील काही वर्षांत शहरांमध्ये हॅसल कल्चर वाढत चालले आहे. एकाच जागी बसून तासन तास काम करण्याचा कालावधी वाढता आहे. त्याचा अव्यक्त ताण मनावर येतो याचाही विसर पडत चालला आहे. या दगदग, धावपळीमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे. प्रवासाचा वेळ. राहत्या घराच्या ठिकाणी कामाच्या जागा असतील तर व्यक्तीची कार्यक्षमता अधिकाधिक वाढेल हे यापूर्वी अनेक नागरी नियोजनाच्या आराखड्यामध्ये सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शहरांतील जागा, वाढती लोकसंख्या, महागाई, मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे नगरनियोजनातील हा प्रकल्प कागदावरच राहतो.
मुंबईची लोकल रेल्वे ही केवळ वाहतुकीची व्यवस्था नाही; ती या शहराची लाईनफाईन आहे. दररोज लाखो लोक या वाहिनीतून प्रवास करतात. मात्र अलीकडे लोकलमध्ये घडलेल्या काही हिंसक घटनांनी केवळ सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला नाही, तर या प्रवासात दडलेल्या मानसिक ताणाचा आणि सामाजिक वातावरणाचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
या धावपळीच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा, पण अनेकदा दुर्लक्षित घटक आहे तो म्हणजे प्रवासाचा वेळ. मुंबईतच नव्हे तर अन्य महानगरांत वाढत चाललेले प्रवासाचे तास हे केवळ वेळेचं गणित नाही, तर मानसिक आणि शारीरिक थकव्याचं मोठं कारण बनलं आहे. घर आणि काम यामधील अंतर वाढत गेलं तशी लोकांची दिवसातील ऊर्जा प्रवासामध्ये अर्धी आटून जायला लागली. गर्दी आणि उशिरा धावणाऱ्या लोकल यामुळे सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊ लागला आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने याचा अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा. गर्दी, विलंब, जागेची कमतरता, सततची धावपळ आणि वेळेवर पोहोचण्याचा ताण या सर्व गोष्टी मेंदूला सतत जागं ठेवतात. शांत होऊ देत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शरीरातील ताण घेण्याची स्थिती दीर्घकाळ सक्रिय राहते आणि त्याचा परिणाम वर्तनावर दिसू लागतो. चिडचिड वाढते, संयम कमी होतो आणि लहानसहान घटनांमध्येही हिंसात्मक वर्तनाची प्रतिक्रिया येते. शहराच्या जीवनशैलीमध्ये हे वर्तन खोलवर रुजत चालले आहे.
गर्दीच्या वातावरणात एक महत्त्वाची मानसिक प्रक्रिया घडते. ती व्यक्ती स्वतःला ‘मी’ म्हणून नव्हे, तर ‘गर्दीचा एक भाग’ म्हणून अनुभवू लागते. मानसशास्त्रात याला de-individuation असे म्हणतात. अशा वेळी वैयक्तिक जबाबदारीची जाणीव कमी होण्याची शक्यता वाढते. सततचा शारीरिक संपर्क, जागेसाठीचा संघर्ष आणि वैयक्तिक ‘स्पेस’चा अभाव यामुळे लोक अधिक रक्षात्मक किंवा आक्रमक (defensive/ aggression) प्रतिक्रिया देऊ शकतात.
अशा प्रसंगांमध्ये अनेक लोक उपस्थित असूनही हस्तक्षेप का करत नाही, हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. जितके अधिक लोक उपस्थित, तितकी जबाबदारी ‘कोणी तरी दुसरा करेल,’ अशी भावना वाढते. यामध्ये भीतीचा घटकही असतो—‘मी हस्तक्षेप केला तर काय होईल?’ ही अनिश्चितता लोकांना थांबवते. रस्त्यावर अपघात झाला की अनेक लोक गोळा होतात. व्हिडीओ बनवतात, हळहळ व्यक्त करतात. पण मदतीला कुणीच पुढे जात नाही. असे का होते?
त्या गर्दीतले लोक वाईट नसतात. मानसशास्त्र सांगतं की हे लोक एका भयंकर मानसिक द्वंदामध्ये अडकलेले असतात, ज्याला म्हणतात— बायस्टँडर इफेक्ट किंवा जबाबदारीचे विकेंद्रीकरण ( Diffusion of Responsibility ). गर्दी वाढली की माणसाची स्वतःची जबाबदारी घेण्याची मानसिकता नष्ट होते. याचे प्रतिबिंब आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये, सोशल मीडियावर आणि समाजात दररोज उमटताना पाहतो.
रोजची उपजीविका, नोकरीचा दबाव, प्रवासातील थकवा आणि आर्थिक अनिश्चितता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सततची मानसिक सजगता आणि टोकाचा थकवा. अशा अवस्थेत सहानुभूती आणि संयम टिकवणे अधिक कठीण होते. हा व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न नसून, दीर्घकालीन ताणाचा परिणाम असतो.
शहरातील वाढता जीवनखर्चही या मानसिक ताणतणावामध्ये भर घालतो. घरभाडे, प्रवास, शिक्षण आणि आरोग्य यांचा आर्थिक भार सतत भविष्याबद्दलची अस्थिरता आणि चिंता वाढवतो. ही अस्थिरता चिडचिड, थकवा आणि भावनिक अस्वस्थेमध्ये भर घालते. त्यातून अशा घटना घडत राहतात
या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात घडलेल्या हिंसक घटना केवळ अपवाद म्हणून पाहणे पुरेसे नाही. त्या व्यापक सामाजिक वाढत्या मानसिक अस्वस्थेतेचे लक्षण म्हणून पाहायला हवे. हे उपाय केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरता मर्यादित न राहता अधिक व्यापक असणे आवश्यक आहे.
या शहराला किंवा कोणत्याही समूहाला टिकवण्याचे खरे सामर्थ्य म्हणजे सर्वसामान्यांची सहनशक्ती. त्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात. ताण सतत आणि दीर्घकाळ टिकतो तेव्हा तो हळूहळू थकव्यामध्ये बदलतो. हा थकवा केवळ वैयक्तिक नसून सामाजिकही असतो.
या परिस्थितीत उपायही शहरांतील व्यक्ती आणि समाज अशा दोन्ही पातळ्यांवर करणे आवश्यक असते. केवळ पायाभूत सुविधा किंवा वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करणे पुरेसे नाही तर कामाच्या संस्कृतीत बदल, लवचिक कामाचे पर्याय, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी शहराचे नियोजन तसेच सार्वजनिक ठिकाणी ताणतणावाचे व्यवस्थापन आणि सहानुभूती याबाबत जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे.
वैयक्तिक पातळीवर ताण ओळखून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आहार, व्यायाम यासह आपल्या झोपेची काळजी घेणे, डिजिटल ओव्हरलोड कमी करणे, श्वसन आधारित तंत्राचा सराव आणि स्वतःला काय वाटते, आपण कोणत्या प्रसंगाला कशी प्रतिक्रिया देतो याबद्दलची सजगता ठेवणे या गोष्टी दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
आक्रमकता सहसा अचानक निर्माण होत नाही. तिचा प्रवास ताण, निराशा, असहाय्यता आणि भावनिक नियंत्रण कमी होण्यापासून सुरू होतो. आजचा सामान्य नागरिक सततच्या तणावात जगतो—कामाचा दबाव, आर्थिक असुरक्षितता, लांबचा प्रवास, अपुरी झोप, वाहतूक, गर्दी आणि भविष्यातील अनिश्चितता. अशा सततच्या मानसिक दडपणामुळे मेंदू कायम ‘सतर्क’ अवस्थेत राहतो आणि किरकोळ कारणांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.
ही अस्वस्थता कोणत्याही एका वयोगटापुरती मर्यादित नाही. किशोरवयीनांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या तणावांना समोर जात आहोत. सोशल मीडियावरील तुलना, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्याच्या समस्या आणि एकाकीपणा. या सर्वांचा परिणाम सहनशीलता कमी होणे आणि भावनिक संतुलन ढासळण्यात होतो. मात्र, प्रत्येक राग हिंसाचारात बदलतोच असे नाही. तसेच प्रत्येक घटनेमागे मानसिक आजार असतोच असेही नाही. अनेकदा परिस्थिती, स्वभाव आणि क्षणिक भावनिक अवस्था यांचा एकत्रित परिणाम कारणीभूत असतो.
अशा घटनांमध्ये अनेकदा लोक मदतीऐवजी मोबाईलवर व्हिडीओ/रील काढताना दिसतात. यामागे केवळ असंवेदनशीलता नसून जबाबदारीचे विभाजन, स्वतःच्या सुरक्षिततेची भीती, गोंधळ आणि मोबाईलचा वाढता ताण यांसारखी मानसशास्त्रीय कारणेही त्यामागे आहेत. एकमेकांच्या मागे उभी राहणारी, मदतीला धावून जाणारी माणसं जेव्हा प्रेक्षक, बघ्याच्या भूमिकेमध्ये जातात तेव्हा सामाजिक स्वास्थ्याचा अधिक खोलात जाऊन विचार करणे गरजेचे आहे.
अशा हिंसात्मक घटना घडतात तेव्हा आपल्यामधील संवेदनशीलता संपली आहे का, असा प्रश्न मनामध्ये येतो. कोणत्याही माणसाच्या मनामध्ये भल्याबुऱ्याची जाणीव ही त्याच्या अंतापर्यंत जागी असते. त्या
आपण खरोखरच थंड रक्ताचे झालो आहोत का? कदाचित नाही. आपण अधिक थकलेले, तणावग्रस्त भावनिकदृष्ट्या अधिकाधिक सुन्न होत चाललो आहोत. सततच्या धक्कादायक दृश्यांमुळे बोथटपणा वाढला आहे. रक्तपात,हिंसा, मारहाण याबद्दल दाटून येणारी अस्वस्थता कमी झाली आहे का, हा प्रश्न आहे. संवेदनशीलता कमी होण्याची शक्यता वाढते. तरीही करुणा संपलेली नाही. ती कृतीत उतरवण्यासाठी जागरूकता आणि सामाजिक जाणीव अधिक गरजेची आहे.
सामाजिक घटकांसह वाढत्या व्यसनाधीनतेकडे आणि त्याच्या बदलत्या प्रकारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यसन या अस्वस्थतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पदार्थजन्य किंवा वर्तनात्मक व्यसनामुळे मेंदूतील डोपामाइन अवस्था बिघडते.भावनिक नियंत्रण कमी होते आणि चिडचिड, अस्वस्थता तसेच अचानक राग येणे, अतिउत्तेजित होण्यामुळे या प्रतिक्रिया अधिक तीव्र होतात.
आजच्या काळातील सर्वात चिंताजनक वास्तव म्हणजे ‘absolute abnormal is the new normal.’—असामान्यता हळूहळू सामान्यतेची जागा घेत आहे. कुटुंब, नातेसंबंध, भावनिक आयुष्य, सामाजिक वर्तन, शिक्षण, व्यसनाधीनता आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत हा बदल दिसतो. चित्रपट, वेब सिरीज आणि डिजिटल कन्टेंटमधूनही हिंसा आणि आक्रमकता अनेकदा सामान्य स्वरूपात सादर केली जाते, ज्याचा परिणाम आपल्या संवेदनशीलतेवर होऊ शकतो. यासोबतच जगभर वाढणारी हिंसा युद्धे, दंगली, घरगुती व सामुदायिक संघर्ष हा समाजातील अस्वस्थता अधिकाधिक अधोरेखित करत आहे. वारंवार घडणारी कोणतीही गोष्ट योग्य ठरत नाही. समाजाची खरी ओळख असामान्यतेला सामान्य मानण्यात नसून संवेदनशीलता, विवेकी माणूसपण जपण्यात आहे हे विसरता कामा नये.
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
