Headlines

साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?


मुंबई पोलीस, एनसीबी अशा विविध यंत्रणांनी वेळोवेळी आपली चोख जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईत 90 च्या काळात एक भयानक आणि धूर्त महिला ही अंमली पदार्थांच्या तस्करांची सम्राज्ञी बनली होती. तिने कोट्यवधी रुपये त्यातून कमावले होते. विशेष म्हणजे ती समाजसेवेला ढाल बनवून स्वत:चा बनाव करायची. पोलिसांनी तिला एकदा अटक केली तेव्हा पोलिसांच्या गाडीला घेरण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांना त्यावेळी लाठीचार्ज करावा लागला होता. या धूर्त आणि महाभयंकर अंमली पदार्थांची तस्कर असलेल्या महिलेला पोलिसांनी अत्यंत चालाखीने अटक करत पुरावे गोळा केले होते. या भायनक महिलेची स्टोरी जाणून घेऊयात.

Mahalaxmi Papamani
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एक महिला मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या तामिळ नागरिकांची मसीहा बनते. ती गोरगरिबांना आर्थिक सहाय्य करायची. गरजवंतांच्या मदतीला धावून जायची. त्यामुळे लोकं तिला देवी मानू लागले. लोकांनी तिला प्रचंड प्रेम दिलं. लोकांसाठी ती अनभिषक्त सम्राज्ञी झाली. पण एनसीबी आणि पोलिसांसाठी ती एक महाभयंकर गुन्हेगार होती. पोलिसांनी तिला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला. पण ज्या झोपडपट्टीत ती राहायची ती झोपडपट्टी नाही तर एक भुलभुलया होतं. या झोडपट्टीत प्रवेश केल्यानंतर विचित्र आणि दाटीवाटीच्या गल्ल्या लागायच्या, तर कधी भुयारं दिसायची. याच दाटीवाटीच्या गल्ल्या, झोपड्या आणि भुयारांमधून लोकं त्यांच्या देवीला म्हणजेच महालक्ष्मी पापामणी हिला पोलीस आल्यावर सुखरुप पळून जाण्यासाठी मदत करायचे.

ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात महालक्ष्मी पापामणी हिच्याविषयी सविस्तर सांगितलं आहे. महालक्ष्मी ही 90 च्या दशकात मुंबईत मादक पदार्थांच्या तस्करीची सम्राज्ञी बनली. ती ज्या झोपडपट्टीमध्ये राहायची तिथे शेकडो कोटींच्या ड्रग्जची विक्री व्हायची. यामध्ये महालक्ष्मीचा रोल महत्त्वाचा होता. ही महालक्ष्मी अंमली पदार्थांच्या या दलदलीत कशी मसीहा झाली? याची देखील रंजक अशी कहाणी आहे.

महालक्ष्मी पापामणी मुळची तामिळनाडूची

महालक्ष्मी पापामणी ही मुळची तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्याची होती. ती एका शेतमजुराची मुलगी होती. 1960 मध्ये तिचा जन्म झाला. तिला तीन भावंड होती. बंगळुरुच्या शिवाजी रोडवर असणाऱ्या झोपडपट्टीत तिचं बालपण गेलं होतं. पापमणी ही 1980 च्या सुमारास मुंबईत आली. त्यावेळचा मुंबईतला तमिळ डॉन वरदाराजन मुनीस्वामी मुदलियार याने तिला मुंबईत आणलं होतं. फक्त तिलाच नाही तर सेलम जिल्ह्यातील अनेक गरिब तमिळ कुटुंबांना वरदाराजनने मुंबईत सायन-कोळीवाड्यात आणलं होतं.

पापामणी डॉनची निकटवर्तीय बनली

वरदारजन मुंबईच्या सायन-कोळीवाड्यात त्या काळात दारु गाळायचा धंदा करायचा. त्याच्या दारु भट्टीमध्ये तो तमिळ लोकांना काम द्यायचा. त्याने सायन-कोळीवाड्यात जणू काही एक छोटं तामिळनाडूचं वसवलं होतं. महालक्ष्मी पापामणी ही अल्पावधित वरदाराजनची निकटवर्तीय बनली होती. डॉनसोबत तिचे चांगले संबंध असल्या कारणाने इतर लोकंही तिला सन्मानाने वागवत. पण काही काळाने मुंबईत दारुबंदी उठली. त्यामुळे वरदाराजनची दारुची भट्टी बंद पडली.

चिंध्या गोळ्या केल्या

परिणामी पापामणी हिचेसुद्धा वाईट दिवस आले. पण ती खचली नाही. तिने चिंध्या गोळ्या करण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर मोलकरीण म्हणून काम केलं. पुढे तिला मणी चिनप्पा देवेंद्र भेटला. तो ड्रग्जच्या पुड्या विकायचा. पण कालांतराने तो शिवडी येथे खाद्यतेलाच्या कंपनीत कामाला लागला.

पापामणी आणि देवेंद्रचे लग्न

महालक्ष्मी पापामणी आणि मणी चिनप्पा देवेंद्र यांनी लग्नगाठ बांधली. दोघे सुरुवातीला मानखुर्द रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीत राहू लागले. यानंतर काही दिवसांनी त्यांनी सायन-कोळीवाड्यात एक खोली विकत घेतली. तिथे ते राहू लागले. देवेंद्रला दारुचे व्यसन होतं. एकेदिवशी संध्याकाळी त्याचा अपघात झाला आणि कायमचे अपंगत्व आलं.

पापामणी ड्रग्जच्या धंद्यात कशी आली?

दोघांना चार मुली आणि एक मुलगा होता. पाच लेकरांचा सांभाळ करत असताना पापामणीची वाईट अवस्था झाली. दोन पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे तिच्यासाठी आव्हानाचं काम होतं. अशाचवेळी तिला शेजारीण मैत्रीण सावित्री हिने तिच्यापुढे ड्रग्जच्या व्यवसायचा प्रस्ताव ठेवला. पैसे चांगले मिळत असल्याने पापामणी देखील तयार झाली.

सावित्रीच्या मदतीने महालक्ष्मी पापामणी हिरॉइनच्या पुड्या बनवायला आणि विकायला शिकली. दोघींसोबत पुढे रे रोड येथे राहणारी ज्योतीदेखील त्यांची सहकारी झाली. तिघींनी या पुड्या विकून अफाट पैसा कमावला. या धंद्यात मिळत असणाऱ्या पैशांना पाहून पापामणीने तिला या काळ्या व्यवसायात जिने आणलं त्या सावित्रीला अलगद बाजूला केलं.

पापामणीने अफाट पैसा कमावला

महालक्ष्मी पापामणी 1991 पासून स्वत: एकटी या काळ्या धंद्यात काम करत होती. तिने अनेकांना पैशांचं आमिष देत या कामात गुंतवलं. अनेकांना वाटे की, महालक्ष्मीने आपला दोन वेळच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला. पुढे सायन-कोळीवाड्याच्या झोपडीत महालक्ष्मीची प्रतिष्ठा वाढली. ती गरजूंना मदत करायची. ती गरिबांची अक्षरश: बँक मानली जाऊ लागली. त्यामुळे पोलीस तिला अटक करायला आले तर झोपडपट्टीतील नागरीक तिला वाचवायचे. पापमणी या गोष्टीचा ढाल म्हणून वापर करायचे.

पदरात 30 ते 40 लाख खोचून फिरायची

महालक्ष्मी पापामणीने त्यावेळी इतकी संपत्ती कमावली होती की, ती घराबाहेर पडायची तेव्हा साडीमध्ये 30 ते 40 लाख रुपये खोचून झोपडपट्टीच्या गल्लाबोळात बेडरपणे फिरायची. पैसा अफाट कमवायची. हा पैसा ठेवण्यासाठी ती आजूबाजूच्या झोपडपट्टीचा आसरा घ्यायची. तसेच तिने तामिळनाडूत अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. अर्थात नंतर पोलिसांनी आणि इतर यंत्रणांनी सर्व मालमत्ता सील केली होती. पापामणी 40 नंबरच्या खोलीत राहायची. पण त्या झोपडपट्टीत 40 नंबरच्या अनेक खोल्या होत्या. पोलिसांना फसवण्यासाठी तशी सोय केलेली होती.

पती आणि मुलीने दिली विरोधात साक्ष

महालक्ष्मी पापामणी हिने पती मणी चिनप्पा देवेंद्र याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल रोष निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांना पापामणीच्या विरोधात कोर्टात जबाब नोंदवण्यासाठी मदत झाली. तसेच पापमणीने आपली मुलगी जयश्री हिला देखील या ड्रग्जच्या धंद्यात अडकवले होते. त्यामुळे तिलाही अटक झाली होती. तिनेदेखील आपल्या आईच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. त्यामुळे पापामणीवरील गुन्हे सिद्ध झाले आणि तिला 2004 मध्ये कोठडीत टाकण्यात आलं. यानंतर दोन वर्ष जेलमध्ये ती होती.

पतीचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, महालक्ष्मीचा पती देवेंद्र हिची 2007 मध्ये संशयास्पदरित्या हत्या झाली होती. गर्दुल्ल्यांनी हल्ला करुन त्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. दरम्यान, पापामणी हिने जेवढ्या मालमत्ता कमवल्या होत्या त्या सर्व सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ती पुन्हा रस्त्यावर आली होती.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा