![]()
“अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. खासगी सावकारी प्रकरणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महसूल व पोलीस प्रशासनाला आणि सहकार मंत्र्यांना थेट इशारा दिला. सहकार मंत्र्यांनी सभागृहाचा गरिमा राखला नाही बच्चू कडू यांनी सहकार विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी विधान परिषदेत खाजगी सावकारी आणि मायक्रो फायनान्सच्या लुटीचा मुद्दा मांडल्यानंतर सहकार मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन माहिती घेणे अपेक्षित होते. जेव्हा मी राज्यमंत्री होतो, तेव्हा सभागृहात मुद्दा आल्यास लगेच पाठपुरावा करायचो. पण आमदार बोलूनही जर खात्याचे मंत्री काहीच करत नसतील, तर पाणी कुठे मुरतंय हे पाहावं लागेल.” “सहकार मंत्र्यांनी जिल्हावार किती सावकारी प्रकरणे दाखल झाली, किती शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाल्या आणि किती जणांवर पोलीस कारवाई झाली, याचा साधा आढावाही घेतलेला नाही. कायद्यात उणिवा नाहीत, पण पैशांच्या ताकदीपुढे अधिकारी दबतात. प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल, तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा दम त्यांनी दिला. कर्जमुक्तीत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या यादीत फरक का?’ राज्यातील कर्जमाफी आणि आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांमधील एक मोठा संभ्रम दूर केला. “राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीत फक्त मुद्दलाची रक्कम दिसत असून व्याजाची रक्कम दिसत नाही, तर जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या यादीत पूर्ण रक्कम दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रीयकृत बँकांना ‘हेअर कट’ लावण्यात आल्याने व्याज बँक माफ करणार आहे आणि मुद्दल सरकार भरणार आहे. जिल्हा बँका आधीच अडचणीत असल्याने सरकारने त्यांना पूर्ण रकमेची हमी दिली आहे.” आधार प्रमाणीकरणात नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे, यावर पर्यायी मार्ग काढून सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. युतीत थोडे रुसवे-फुगे चालायचेच!; ठाणे वादावर भाष्य ठाण्यातील शासकीय कार्यक्रमात भाजप आमदाराला डावलल्याने निर्माण झालेल्या वादावर बच्चू कडू यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. “दोन वेगवेगळे पक्ष युतीत आल्यावर दोन भाऊ जसे एकत्र राहताना कधीतरी भांडतात, तसे हे रुसवे-फुगे चालूच राहतात. शेवटी युती टिकवायची असल्याने हे सगळं सहन करावं लागतं. यावर मी आताच बोललो तर भाजपचे रुसवे-फुगे आणखी वाढतील, त्यामुळे वेळ आल्यावर बोलेन.” अभिजीत दीपकेंना माझा पाठिंबा, कारण मुद्दा तरुणांच्या भवितव्याचा कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते अभिजीत दीपके यांची घेतलेली भेट राजकीय नसून एका आंदोलकाची दुसऱ्या आंदोलकाशी असलेली भेट असल्याचे बच्चू कडू म्हणाले, “मी एका महाराष्ट्राच्या तरुणाच्या आणि आंदोलकाच्या पाठीशी उभा आहे. शेतीमालाला भाव नाही, व्यवसाय चालत नाहीत; अशा वेळी सरकारी नोकरी हाच गरिबांच्या मुलांसाठी एकमेव मार्ग आहे. परीक्षांमध्ये करप्शन झाले तर तरुणांनी कुठे जायचे? त्यामुळे परीक्षा निष्कलंक झाल्याच पाहिजेत, या मुद्द्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.” मंत्रिपदापेक्षा आम्ही त्याचे बाप आहोत! मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची अपेक्षा आहे का, या प्रश्नावर बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उत्तर दिले. “आम्ही कोणत्याही मंत्रिपदाच्या अपेक्षा ठेवून काम करत नाही. एक शिवसैनिक आणि कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की, मंत्रिपदापेक्षाही आम्ही त्याचे बाप आहोत; त्यामुळे आम्हाला त्याची कसलीही फिकीर नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
Source link
सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल
