Central Railway Escalators: प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले सरकते जिने गर्दीच्या वेळीच बंद असल्यामुळे नागरिकांना पुलावर चढून जावं लागतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे जिने अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना पायऱ्यांवरूनच पादचारी पुलावर चढावे लागत असून ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
तक्रार केल्याशिवाय दुरुस्त होत नाहीत
डोंबिवली हे अत्यंत गर्दीचे स्थानक असून येथे क्रमांक ५च्या फलाटावर केवळ उतरणारा सरकता जिना बसविण्यात आला आहे. त्यामुळे या फलाटावर उतरलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या फलाटांवरील सरकते जिने गर्दीच्या वेळीच बंद राहतात, अशीही तक्रारआहे. तसेच, हे जिने बंद पडल्यानंतर प्रवासी किंवा प्रवासी संघटनांकडून तक्रार केल्याशिवाय दुरुस्ती होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पावसाळ्यात पूर्वेकडील परिसर पाण्याखाली जात असल्याने सरकते जिने आणि लिफ्टही बंद पडतात. परिणामी, पावसाळ्यात प्रवाशांना या सुविधांशिवायच ये-जा करावी लागते.
कल्याण स्थानकात पश्चिमेकडील बाजूस असलेले सरकते जिने मध्यवर्ती पुलासाठी असले तरी त्यांची रचना सोयीची नसल्याने गर्दीच्या वेळी या जिन्यांचा उपयोग मर्यादित ठरतो. अनेकदा हे जिने बंदच असतात. तसेच आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांवरील जिनेही एकदा बंद पडल्यावर पुन्हा सुरू होण्यासाठी विलंब होतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे. यामुळे सरकत्या जिने शोभेसाठी बसवली आहेत का, असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
अनवधानाने बंद
दरम्यान, सरकत्या जिन्यांच्या स्लायडिंगजवळ असलेले बटण अनवधानाने प्रवाशांच्या स्पर्शाने बंद होते. त्यामुळे जिने आपोआप थांबतात. ते पुन्हा सुरू करण्यास सुमारे अर्धा तास लागतो. दिवसभरात अशा प्रकारे चार ते पाच वेळा जिने बंद होतात, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवसाची सुरुवात रेल्वे बिघाडाने
सकाळी लवकर आपापल्या कार्यालयांत पोहोचण्याच्या गडबडीत असलेल्या मुंबईकरांच्या शुक्रवारची सुरुवातच बिघाडाने झाली. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात रुळाला तडा गेल्याने रेल्वे खोळंबली. तर पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर आणि पॉइंटबिघाडामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. दोन्ही मार्गांवर सकाळीच झालेल्या बिघाडामुळे लोकल फेऱ्या सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. विशेष म्हणजे, याबाबत कोणतीही उद्घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत नसल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते दादर दरम्यान सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल फेऱ्या विस्कळीत झाल्या. सकाळी गर्दीच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी प्रवासी रेल्वे फलाटावर दाखल होत होते. मात्र अर्धा-पाऊण तास लोकलच येत नसल्याने प्रवाशांनी समाजमाध्यमांवर रोष व्यक्त केला. रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने काम सुरू केल्यानंतर, सुमारे दीड तासाने काम पूर्ण झाले. साडेसात वाजण्याच्या सुमारास लोकल वाहतूक सुरू झाली. मात्र सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चर्चगेटमधील रुळांच्या पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा लोकलच्या एकामागोमाग एक लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे रेल्वेच्या कारभारासह देखभालीवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा