एकनाथांनी भागवतात म्हटलं आहे, ‘ऐक ते भक्तीचा इत्यर्थ। सांडोनियां विषयस्वार्थ। जीवींहूनि मजलागीं भावार्थ। तोचि निजभक्त पै माझा।। भक्त आणि करी धनार्जन। हेंचि भक्तीसी मुख्य विघ्न। धनलोभी तो अभक्त पूर्ण। सत्य जाण उद्धवा।।’

गायीच्या मागोमाग वासरू येणारच, तसंच उत्कट, खर्या भक्तीबरोबर विरक्ती येणारच, असं ‘गोवत्स न्याय’ सांगतो. एकदा परमेश्वरामध्ये मन गुंतलं की आपोआप इतर सगळ्याच भौतिक गोष्टींमधून ते मोकळं होऊ लागतं. पण असा अनुभव पूर्वीसुद्धा अपवादानंच यायचा. आत्ताच्या काळात तर गावागावातले मठ, आश्रम आणि त्यांचे अधिपती यांच्याकडं पाहिलं की वेगळंच चित्र दिसतं. तसं दिसणं स्वाभाविक आहे, असं महाभारतातल्या एका कथेवरून वाटतं. ती कथा अशी – पांडवांचा राजसूय यज्ञ झाला, युधिष्ठिराचं राज्य सुरू झालं.
आम्हाला मदत करा,’ अशी विनंती करतात. युधिष्ठिर त्यांना हवं असलेलं द्रव्य देतो. मग दुसर्या गावातले लोक येतात. तशीच विनंती करतात. राजा त्यांचीही विनंती मान्य करतों. आणि मग गावागावातले लोक येऊन मंदिर बांधण्यासाठी द्रव्य देण्याची विनंती करू लागतात. राजा ती आनंदानं मान्य करू लागतो. दुसर्या आठवड्यातही असे लोक येतात, राजा त्यांना मदत करतो. तेव्हा त्याचा एक मंत्री विचारतो, ‘राजन, हे काय चालू आहे?’ राजा म्हणतो, ‘यामध्ये वाईट काय आहे? लोकांना भक्तिभावानं मंदिर बांधायचं आहे. त्यासाठी ते द्रव्य मागताहेत. गावागावात मंदिरं उभी राहणं चांगलंच आहे.’ तेव्हा तो मंत्री म्हणतो, ‘राजा, जेव्हा एखाद्या समाजातल्या लोकांचा स्वतःवरचा आणि दुसर्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, तेव्हा त्या समाजात मंदिरं आणि देव यांची संख्या वाढू लागते.
तुझ्या राज्यात मंदिरं आणि देव वाढत असतील तर कुठं, काय चुकतंच याचा शोध घे…’ आज अशीच परिस्थिती आहे. मंदिरं, मठ, आश्रम यांची वाढती संख्या, त्यांचे वातानुकुलित खोल्यांचे भक्तनिवास, तिथं होणारी गर्दी, दर्शनासाठी लागणार्या रांगा… बहुसंख्य आश्रमाधिपती हे जणू नवे संस्थानिकच अशी त्यांची राहणी आणि थाटमाट! त्यातल्या काहींच्या कहाण्या वर्तमानपत्रांत येतात. ते वाचून लक्षात येतं, हे सारं ‘खरी भक्ती’मध्ये बसणारं नाही.

