जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि शिवसेनेत फूट पडली. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं नवीन सरकार स्थापन केले. दोन शिवसेना झाल्यानंतर सुरु झाली शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्य़बाण यासाठीची लढाई… फेब्रुवारी 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” हे नाव आणि “मशाल” हे नवीन चिन्ह देण्यात आले. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात 22 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी “शिवसेना” नाव आणि “धनुष्यबाण” चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि अंतिम निकालापर्यंत शिंदे गटास चिन्हाचा वापर करण्यास मुभा दिली. एकनाथ यांचा पक्ष हाच खरी शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. तर बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही याचिकांवर गुरुवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहेत. या प्रकरणी अखेर सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया..