Headlines

शिंदेंना बळ फडणवीसांना शह?


सहा खासदारांचे पक्षांतर हे ऑपरेशन टायगर नसूनऑपरेशन फडणवीस असल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले, अलीकडील राजकीय घडामोडी बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पेंद्रीय नेतफत्वाकडून शिंदेंना अधिक पाठबळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ऑपरेशन टायगर दोन नंतर आता ऑपरेशन टायगर तीनची तयारी शिंदे यांनी सुरू केली आहे. गेल्याच आठवड्यात विधानसभेत बोलताना शिंदे यांनी विरोधकांना आणखी झटके बसणार असल्याचा इशारा दिला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवठ्यात मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच अधिक चर्चा होती, एकुण राज्यातील सध्याचे राजकारण बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी शिंदेंना दिल्लीतून बळ दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

2022 नंतर महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर कधी काय होईल हे सांगता येत नाही, सहा खासदारांच्या ऑपरेशन टायगरनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशनाच्या नंतर मोठा राजकीय भूकंप झाल्याचे अनेकवेळा दिसले. कारण अधिवेशनाच्या निमित्ताने सगळे आमदार एकत्र मुंबईत असतात, शिवसेनेत सहा खासदार गेल्याने एकनाथ शिंदे यांची संसदीय ताकद वाढली आहे.

केंद्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे, तर प्रतापराव जाधव यांच्याकडील राज्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. उध्दव ठाकरे यांनी सहा खासदारांच्या मतदार संघात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा  प्रयत्न केला.

मात्र ठाकरे मुंबईला येताच मागे पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. ठाकरे यांनी नागपूरला जाताना विमानात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेला एकत्र प्रवास, तसेच हे ऑपरेशन टायगर नसून आपॅरेशन फडणवीस आहे, फडणवीसांचे दिल्लीतून पंख छाटले जात असल्याचे म्हटले तर राज ठाकरे यांनी 2029 ला अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचे असल्याने प्रादेशिक पक्षाला वेगळ्या पध्दतीने आपल्या बाजुला वळवले जात असल्याचे सांगितले. उध्दव ठाकरे यांनी केलेल्या ऑपरेशन फडणवीसच्या आरोपामुळे शिंदेंना बळ देत फडणवीसांना शह अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही चर्चा जोपर्यंत पुढील महत्त्वाची राजकीय घडामोड होत नाही तोवर अशीच सुरू राहणार. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शिंदे यांचा वाढलेला आत्मविश्वास आणि देहबोली सगळं सांगत होती की शिंदे यांना भाजपकडून पॉवर प्ले दिला आहे आणि या पॉवर प्लेचा शिंदे पुरेपुर वापर करणार यात शंका नाही. सध्या भाजपचे पक्षप्रवेश थांबलेले आहेत, मात्र शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यात ऑपरेशन टायगर नंतर हा ओघ वाढताना दिसत आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे हे राम तर देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मण असल्याचे वक्तव्य केले. राज्यात शिवसेनेचे खासदार वाढले आहेत, पण आमदार हे भाजपचेच जास्त आहेत. मुख्यमंत्री भाजपचा असताना मुख्यमंत्री लक्ष्मण आणि उपमुख्यमंत्री राम ही उपमा दिल्यावर भाजपकडून कोणी काहीही न बोलणे, यातच खूप काही समजतं. ज्या भाजपने साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसत असताना, भाजपचा अध्यक्ष ऐनवेळी कसा बसवला हे महाराष्ट्राने पाहिले. शंभुराज देसाई तर त्यानंतर खूप मवाळ झाले. त्याच भाजपने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडून निवडून आलेल्या भाजपच्या बंडखोराला शिवसेनेकडे पाठवावे लागले. शिंदे यांच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी भाजपच्या बंडखोराला उध्दव ठाकरे यांनी मदत केली. म्हणजेच भाजपने ठाकरेंच्या मदतीने शिंदेंच्या उमेदवारांचा गेम  केला.

भाजपचा हा नवीन फॉर्म्युला भविष्यात शिंदेंना अनेक ठिकाणी धोका देऊ शकतो, हे शिंदेंच्या लक्षात आले. फडणवीस आणि ठाकरे यांच्या या खेळीनंतर शिंदेंनी असा गेम फिरवला की बंडखोर गोकुळ गिते यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला. शिदेंनी गितेंचा शिवसेनेत प्रवेश करत भाजप आणि ठाकरे दोघांना काय द्यायचा तो संदेश दिला,

या खेळीमुळे भविष्यात ठाकरे गट शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकणार नाही. या सगळ्या राजकीय घडामोडी बघता सध्या शिंदेंच्या बाजुने दिल्लीतील वातावरण अनुकुल असल्याचे दिसत आहे. शिंदे यांचा कामाचा आवाका, पक्षाचा विस्तार आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात महायुतीचा चेहरा म्हणून शिंदे पुन्हा एकदा समोर येताना दिसतील. रविवारी झालेल्या ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत देखील शिंदे यांचे बारीक लक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने 21 पैकी 16 जागा जिंकल्या. ठाकरे यांनी कधीच अशा छोट्या मोठ्या निवडणूकीत लक्ष घातले नाही, शिंदे मात्र या छोट्या छोट्या निवडणूकीत देखील कार्यकर्त्यांना बळ देताना दिसतात.

शिंदेंना फ्रि हँड दिल्यास शिंदे हे भाजपसाठी विशेषत: देवेंद्र फडणवीसांसाठी मोठी अडचण ठरणार हे मात्र नक्की, भाजपकडून पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव केव्हाही पुढे येऊ शकते. त्यामुळे फडणवीसांना शह देण्यासाठी शिंदे यांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. शिंदे यांचे टार्गेट केवळ मुख्यमंत्री पद आहे तर फडणवीस हे लंबी रेस का घोडा आहेत.

दिल्लीच्या राजकारणाचा विचार करता त्यांचे कमी वय ही त्यांची सगळ्यात जमेची बाजू आहे तर संघाचा त्यांना कायम आशिर्वाद राहिला आहे. त्यामुळे फडणवीसांना राज्यातच असुरक्षित करण्यासाठी शिंदेना बळ दिले जात आहे. पण फडणवीस हे शांत असले तरी गेल्या वर्षी जशी त्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांची मालिका लावली. संजय शिरसाटांची पैशानी भरलेली बॅग, योगेश कदमांच्या आईच्या नावाने लेडीज बार, भरत गोगावलेंची अघोरी पुजा, त्यामुळे शिंदे यांच्या मंत्र्यांना यापुढे अलर्ट राहावे लागणार आहे.

अन्यथा भाजपने मालिका सुरू केल्यावर काही खरे नाही. पावसाळी अधिवेशन आणि राजकीय भूकंप हे समीकरण आहे. त्यामुळे अजुन दोन आठवडे चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनानंतर कोणता राजकीय भूकंप होतो, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत