Blood Banks:मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीतमध्ये रक्तसंकलन, रक्तवितरण,आणि प्रत्यक्षात करण्यात आलेल्या जमा-खर्चाच्या नोंदनीचा पडताळणीतून रक्तपेढीत रक्तविक्रीतून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रक्ताचा वापर कोणत्या गोष्टींसाठी होतो ?
रक्तदानातून संकलित होणाऱ्या रक्ताचा वापर केवळ रक्तपूर्ततेसाठी होत नाही. तर रक्तपिशवीचे विभाजन (कंपोनण्ट सेपरेशन) करून प्लाझ्मा, पॅक्ड रेड सेल्स (पीआरबीसी) आणि प्लेटलेट असे घटक स्वतंत्र केले जातात. त्यामुळे एका रक्तपिशवीतून एकापेक्षा अधिक रुग्णांना उपचारमिळण्याबरोबरच रक्तपेढीला विविध घटकांद्वारे स्वतंत्र उत्पन्नही मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार, सन २०२५मध्ये एकूण २३,५०० रक्तपिशव्यांचे संकलन झाले. यामध्ये ३५० मिली आणि ४५० मिली रक्तपिशव्यांचा समावेश होता. रक्तघटक विघटनानंतर एका पिशवीतून सरासरी २०० ते २५० मिली प्लाझ्मा मिळतो. सरासरी २२० मिली प्लाझ्मानुसार २३,५०० पिशव्यांमधून सुमारे ५१.७० लाख मिली (५,१७० लिटर) प्लाझ्मा उपलब्ध झाला. या प्लाझ्मा प्रक्रियेसाठी प्रतिलिटर सुमारे १,६०० रुपये दर असल्यास यामधून सुमारे ८२.७२ लाख रुपयांचे उत्पन्न यावर्षी मिळाले आहे.
रक्तपेढीस तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची शक्यता
संकलित रक्तातील विविध कारणांमुळे काही पिशव्या वजा केल्यानंतर सुमारे २० हजार रक्ताच्या पिशव्या युनिट वापरासाठी उपलब्ध होतात. सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये प्रतियुनिट १,५०० रुपये दर गृहित धरल्यास या पिशव्यांतून जे. जे. महानगर रक्तपेढीस तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची शक्यता आहे. १२ हजार युनिट प्लेटलेटसाठी प्रतियुनिट ४६० रुपये दराने ५५.२० लाख रुपयांचे उत्पन्न रक्तपेढीला मिळाले. या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार केल्यास सन २०२५मध्ये रक्तसंकलनातून सुमारे चार कोटी ३७ लाख ९२ हजार रुपये इतके उत्पन्न जे. जे. महानगर रक्तपेढीला मिळाले, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
आकडेवारीमध्ये गोंधळ
४५० आणि ३५० मिली रक्तपिशव्या, रक्तविघटनाचे प्रमाण, गुणवत्तेचे निकष, विनावापर टाकून द्याव्या लागणाऱ्या पिशव्या, सरकारी नियमानुसार आकारण्यात येणारे दर याचा एकूण ताळेबंद मांडल्यानंतर रक्तविक्रीमधून जे. जे. महानगररक्तपेढीला इतके उत्पन्न मिळाले. ई-रक्तकोष येथे रक्तपेढीने दिलेली आकेडवारी वेगळी आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी) आणि ‘एमडॅक्स’ यांच्याकडून वर्षाला सुमारे तीस हजार पिशव्या उपलब्ध होतात. वैद्यकीय प्राधिकरणाकडून २० हजार पिशव्या विकत घेण्यासाठी अंदाजे एक कोटी रुपये ‘एसबीटीसी’कडून खर्च करण्यात येतात. तसेच सरकारकडून या रक्तपेढीला तीन कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात येते.

