मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे प्रेक्षकांचे आवडते सेलिब्रिटी कपल मानले जाते. सोशल मीडियावर हे दोघेही त्यांच्या गाण्यांसोबतच वैयक्तिक आयुष्यातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

हे जोडपे प्रथमेशच्या मूळ गावी, रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली येथे भेट देत असते. या भेटीतील काही सुंदर क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ते फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये दिसणारं पारंपरिक कौलारू घर, आजूबाजूला पसरलेली दाट हिरवाई, झाडांनी वेढलेलं अंगण आणि कोकणातील शांत, निसर्गरम्य वातावरण अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. आधुनिक जीवनशैलीच्या गजबजाटापासून दूर असलेलं हे साधं पण मनमोहक घर पाहून अनेकांनी कोकणातील पारंपरिक घरांचं आणि ग्रामीण जीवनाचं कौतुक केलं आहे.
मुग्धा आणि प्रथमेश यांच्या या शेअर केलेल्या फोटो मुळे केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे, तर कोकणातील पारंपरिक वास्तुकला आणि निसर्गसौंदर्याची आवड असलेल्या अनेकांनाही आरवली गावाची नव्याने ओळख झाली आहे. जर तुम्हाला कोकणातल्या घरांची झलक तुमच्याही घरीत हवी असेल तर हा लेख एकदा वाचाच. (फोटो सौजन्य :- @prathamesh_laghate_adhikrut, @mugdhabhagawan5)
कोकणाच्या कुशीत वसलेलं आरवली गाव
रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली हे निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव आहे. चारही बाजूंनी हिरवीगार झाडं, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा आणि शांत वातावरण यामुळे हे गाव कोकणाच्या अस्सल सौंदर्याचं दर्शन घडवतं. शहराच्या धकाधकीपासून दूर असलेलं हे ठिकाण शांतता आणि निसर्गाचा अनुभव देणारं आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्येही या गावाचं सौंदर्य स्पष्टपणे पाहायला मिळतं. घराभोवतीची दाट झाडं, मोकळं अंगण आणि पारंपरिक रचना पाहून अनेक चाहत्यांनी या घराचं कौतुक केलं आहे.
पारंपरिक झोपाळा
कोकणातील अनेक घरांच्या ओसरीत किंवा अंगणात लाकडी झोपाळा असतो. हा झोपाळा केवळ सजावटीचा भाग नसून घरातील निवांत क्षण घालवण्याचं खास ठिकाण असतं. सकाळचा चहा, संध्याकाळचा गार वारा किंवा कुटुंबीयांसोबतच्या गप्पा अशा अनेक आठवणी या झोपाळ्याशी जोडलेल्या असतात. आजही अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनीत, व्हरांड्यात किंवा बागेत पारंपरिक लाकडी झोपाळा बसवून घराला ग्रामीण आणि आकर्षक लुक देण्याचा प्रयत्न करतात.
कौलारू घराने वेधलं लक्ष
फोटोंमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे प्रथमेशचं पारंपरिक कौलारू घर. काळाच्या ओघात आधुनिक वास्तूंचं प्रमाण वाढलं असलं तरी कोकणातील अनेक घरांनी आजही आपली पारंपरिक ओळख जपली आहे. या घराची रचना अगदी साधी पण मनाला भावणारी आहे. मातीच्या रंगाच्या भिंती, लाल कौलांचं छप्पर, प्रशस्त ओसरी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई यामुळे घराला वेगळंच सौंदर्य लाभलं आहे. घरासमोरचं मोकळं अंगण आणि नैसर्गिक वातावरण पाहून ग्रामीण जीवनाची आठवण जागी होते.
घराच्या सजावटीसाठी मिळतील भन्नाट कल्पना
या घराची रचना पाहून घर सजावटीसाठी अनेक कल्पना घेता येऊ शकतात. नैसर्गिक साहित्याचा वापर, लाकडी दरवाजे, मातीच्या रंगसंगतीच्या भिंती, पारंपरिक दिवे आणि मोकळी ओसरी यामुळे घर अधिक आकर्षक दिसतं. आजकाल अनेकजण आपल्या घरात ‘व्हिलेज थीम’ किंवा ‘रस्टिक डेकोरेशन’ करण्याला प्राधान्य देतात. अशा वेळी कोकणातील पारंपरिक घरांपासून प्रेरणा घेऊन घर अधिक उबदार आणि नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने सजावट करता येते.
तुळशी वृंदावन
कोकणातील पारंपरिक घरांच्या अंगणात किंवा ओसरीसमोर तुळशी वृंदावन हमखास पाहायला मिळते. तुळशीचं रोप हे केवळ धार्मिक श्रद्धेचं प्रतीक नसून घराच्या सौंदर्यातही भर घालणारं असतं. माती, दगड किंवा सिमेंटपासून तयार केलेलं आकर्षक वृंदावन अंगणाला पारंपरिक आणि प्रसन्न स्वरूप देतं. आजही अनेकजण आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशी वृंदावन उभारून घराला अस्सल भारतीय आणि ग्रामीण लूक देण्याचा प्रयत्न करतात.

