त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मीरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात अध्यक्ष गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.
मागील दहा ते बारा वर्षांपासून महाराष्ट्रात मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती राज्यभर व्यापक जागृती करीत आहे. सातत्याने संघर्ष करून मराठीचे अस्तित्व टिकवत आहे. त्याचप्रमाणे बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी मराठी बांधवांचा 70 वर्षांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे.
या बैठकीत मराठी भाषा, मराठी संस्कृती, अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी संयुक्तपणे संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. याबाबत राज्यभर जनजागृती, संघटना बांधणी, लोकसहभागातून मराठी एकीकरणाचा व्यापक लोकलढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
