विद्यार्थ्यांची हजेरी द्यावी लागणार ऑनलाईन : शिक्षण विभागाची बैठक
. भा. प्रतिनिधी
बेळगाव
सरकारी शाळांच्या पाठोपाठ आता अनुदानित शाळांनाही निरंतर अॅप सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची हजेरी आता जीपीएस सिस्टिमद्वारे ऑनलाईन करावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे तीन अँगलचे फोटो काढण्याची सूचना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हलगा येथे झालेल्या बैठकीत मुख्याध्यापकांना याबाबत सूचना करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन व्हावी यासाठी निरंतर अॅप सुरू करण्यात आले. यापूर्वी केवळ सरकारी शाळांसाठी हे अॅप देण्यात आले होते. आता याचा विस्तार करून अनुदानित शाळांनाही अॅप सक्तीचे करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी गुरुवारी हलगा येथील भरतेश नरसिंग कॉलेजमध्ये बैठक घेण्यात आली. बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये शिक्षकांना इंटरनेट सुविधेसह ऑनलाईन मोबाईल अॅपविषयीची प्राथमिक माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे तीन अँगलचे फोटो घेऊन नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
